ओव्हल, भारत वि. इंग्लंड कसोटी : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि विक्रम हे समीकरण इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत वारंवार पाहायला मिळत आहे. ओव्हल येथे सुरू असलेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही याची प्रचिती आली. यावेळी त्याने वेस्ट इंडीजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराला मागे टाकले. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जलद १८००० धावा करण्याचा विक्रमात लाराला हरवले.
सॅम कुरनने लोकेश राहुलला बाद करताच विराट फलंदाजीला आला. त्याने चेतेश्वर पुजारासह ३१ धावांची छोटेखानी भागीदारी केली. मात्र, जेम्स अँडरसनने एकाच षटकात पुजारा व अजिंक्य रहाणेला बाद केले. त्यानंतर विराटने कसोटी पदार्पण करणाऱ्या हनुमा विहारीसह ५१ धावा जोडल्या. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या विराटला बेन स्टोक्सने बाद केले. विराटने ७० चेंडूत ४९ धावा केल्या. त्यात ६ चौकारांचा समावेश होता.
२९ वर्षीय विराटच्या ओव्हलवरील त्या खेळीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८००० धावांचा टप्पा ओलांडला. त्याने ३८२ डावांत हा पल्ला गाठला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा सर्वात जलद पल्ला ठरला. याआधी हा विक्रम लाराच्या नावावर होता. त्याने ४११ डावांत हा टप्पा ओलांडला होता.. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरला त्यासाठी ४१२ डाव खेळावे लागले होते.