लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : कोणतीही गोष्ट पहिल्यांदा करत असताना मनात हुरहुर असते... पोटात गोळा आलेला असतो, नेमकं काय आणि कसं करायचं, यासारखे बरेच प्रश्न मनाला भेडसावत असतात. पण ही गोष्ट करण्यापूर्वी आपण ज्यांना आदर्श मानतो, त्यांच्याशी दोन शब्द बोललो तर आधार मिळतो आणि सारे काही आलबेल होते. असेच काहीसे त्याच्या बाबतीत झाला. आंतरराष्ट्रीय सामन्यात तो पहिल्यांदा मैदानात उतरणार होता. त्यावेळी त्यालाही दडपण आलं, त्याने डोळ्यापुढे आलेल्या आदर्श व्यक्तीशी संवाद साधला आणि त्याच्यासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची ठरली. ही गोष्ट आहे हनुमा विहारीची.
हनुमाला इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात पदार्पण करण्याची संधी देण्यात आली. भारतीय संघ जेव्हा अडचणीत होता तेव्हा त्याने 56 धावांची दमदार खेळी साकारली, त्याचबरोबर रवींद्र जडेजाबरोबर 77 धावांची भागीदारीही रचली.
मैदानात उतरण्यापूर्वी हनुमाला दडपण आले होते. त्यावेळी त्याने संवाद साधला तो भारताचा माजी महान फलंदाज आणि भारतीय युवा संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडशी. हनुमाने द्रविडशी संवाद साधला आणि त्याचे मनोबल उंचावले.
द्रविड हनुमाशी नक्की काय बोलला...द्रविड म्हणाला की, " तुझ्यामध्ये गुणवत्ता आहे. चांगली कामगिरी करून धावण्याची जिद्द आहे. तुझे मनोबलही उत्तम आहे. या साऱ्या गोष्टींचाच मैदानामध्ये योग्य वापर कर. या गोष्टींचा योग्य अवलंब केल्यास तुला नक्कीच यश मिळेल."