मुंबई, भारत विरुद्ध इंग्लंड : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यात बरेच विक्रम होणार आहे. त्यापैकी एक विक्रम करणार आहे भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे. कारण या सामन्यात जर त्याला संधी मिळाली तर त्याचा हा अर्धशतकी कसोटी सामना ठरू शकतो.
पन्नासावा कसोटी सामना खेळणारा रहाणे हा 32वा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. त्याचबरोबर क्रिकेट विश्वातील तो 280वा खेळाडू ठरू शकतो. आतापर्यंत भारताचे माजी खेळाडू इरापल्ली प्रसन्ना आणि किरण मोरे यांनी 49 कसोटी सामने खेळले होते, अजिंक्यला यावेळी त्यांच्यापुढे जाण्याची संधी आहे.
अजिंक्यने आतापर्यंत 49 कसोटी सामन्यांमध्ये 41.50च्या सरासरीने 3113 धावा केल्या आहेत. यामध्ये नऊ शतकांसह 14 अर्धशतकांचा समावेश आहे. एक क्षेत्ररक्षक म्हणूनही अजिंक्यने आपला ठसा उमटवला आहे. आतापर्यंत 49 सामन्यांमध्ये त्याने 63 झेल टिपले आहेत.