मुंबई, भारत विरुद्ध इंग्लंड : अॅलिस्टर कुक. एक तपस्वी. जंटलमन क्रिकेटपटू. एक आदर्श क्रिकेटपटू कसा असावा याचा उत्तम वस्तुपाठ दाखवणारा. मग ती फलंदाजी असो किंवा नेतृत्त्व, कुकने नेहमीच आपलं शंभर टक्के योगदान दिलं. त्यामुळेच तो राजस, लोभस वाटतो. त्यामुळेच त्याने जेव्हा निवृत्तीचा निर्णय घेतला तेव्हा भारतीय चाहतेही हेलावले. प्रतिस्पर्ध्यांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरलेला. मितभाषी, पण आपल्या बॅटने बोलणारा कुक आता यापुढे क्रिकेटच्या मैदानात दिसणार नाही, ही सल प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात असेल.
भारताविरुद्ध 12 वर्षांपूर्वी मिसरूड न फुटलेला कुक पदार्पणासाठी नागपूरच्या मैदानात उतरला होता. मार्कस ट्रेसकॉटिक भारताच्या दौऱ्यावर येऊ शकत नव्हता. त्यावेळी कुकला पाचारण करण्यात आलं. पहिल्या डावात कुकने अर्धशतक झळकावलं, पण त्याला शतकाने हुलकावणी दिली होती. कुकने ही कसर दुसऱ्या डावात भरून काढली. या शतकानंतर ट्रेसकॉटिकचा संघातील पत्ता कट झाला आणि कुक नावाचा ध्रुवतारा इंग्लंडच्या क्रिकेट नभांगणात झळकला. त्यानंतर सलग आतापर्यंत तो इंग्लंडसाठी खेळला. यामध्येच त्याचा फिटनेस आणि खेळावरची अपार श्रद्धा तुम्हाला कळू शकते. पहिला सामना आणि अखेरचा सामनाही तो भारताबरोबर खेळतोय, हा एक योगायोगच म्हणावा लागेल.
कुकच्या फिटनेसबद्दल बोलावे तेवढेच थोडे आहे. कारण कुक निवृत्त होत असतानाही स्लीपमध्ये उभा राहतो. हे तर काहीच नाही, तो अजूनही सिली पॉइंट आणि शॉर्ट लेगला उभा राहून क्षेत्ररक्षण करतो. साधारणत: युवा खेळाडूंना या जागेवर क्षेत्ररक्षणासाठी उभे केले जाते. कारण त्यांचे रिफ्लेक्शन चांगले असतात. पण कुक अजूनही त्याच जागेवर उभा राहतो, यामध्येच त्याचा फिटनेस काय असेल, हे समजू शकतो.
कुक कधीही वादात अडकला नाही. कुणाला शिव्या देणे तर दूरचीच बात. मोठ्या बाता त्याने कधीच मारल्या नाहीत. इंग्लंडकडून सर्वाधिक धावा त्याच्या नावावर असल्या तरी मी कुणी महान क्रिकेटपटू असल्याचा लवलेश त्याला चिकटलेला नाही. अहंकार, आक्रमकपणा त्याच्यापाशी नाही. एखादा संत तुमच्या समोर यावा. चेहऱ्यावर तेज असावं, ओठांवर स्मित असावं, वाणीत मधुरता असावी, असंच कुकच्या बाबतीत नेहमीच झालंय.
पहिल्या सामन्यात शतक आणि पहिल्या वर्षात एक हजार धावा, असा विक्रम त्याने नोंदवला. त्यानंतर एकामागून एक धावांच्या राशी तो उभारत राहीला. 2011 साली इंग्लंडने जी अॅशेस मालिका जिंकली त्यामध्ये कुक मोलाचा वाटा होता. कर्णधारपद स्वीकारल्यावर कुकने इंग्लंडला भारतात ऐतिहासिक विजय मिळवून दिला. इंग्लंडला भारतामध्ये 1984–85 सालानंतर मालिका विजय मिळवता आला नव्हता, तो कुकने नेतृत्त्व स्वीकारल्यावर मिळवून दिला. नेतृत्त्व स्वीकारल्यावर पहिल्या पाच कसोटी सामन्यांत त्याने पाच शतके लगावली होती, हा अनोखा विक्रमही कुकने पादाक्रांत केला.
ग्रॅहम गुच हे कुकचे आदर्श क्रिकेटपटू होते. कुकला काही अडचण आली तर तो गुच यांच्याकडे जायचा आणि पुन्हा मैदानात धावांच्या राशी उभारायचा. या गुच यांचा इंग्लंडसाठी सर्वाधिक धावांचा विक्रमही कुकने आपल्याच नावावर केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा ते बारा हजार धावा करणारा सर्वात युवा खेळाडू हा विक्रम अजूनही कुकच्याच नावावर आहे.
कर्णधार असताना केव्हिन पीटरसनसारख्या अवली खेळाडूला संघाबाहेर काढण्याचा निर्णय कुकने मोठ्या धारीष्ट्याने घेतला. काही झाले तरी शिस्त पाळली गेलीच पाहिजे, हे कुकने आपल्या निर्णयातून दाखवून दिले होते. पीटरसनसारखा खेळाडू गमावणे इंग्लंडच्या संघाला परवडणारे नव्हते. पण तरीही कुकने पीटरसनला संघाबाहेर बसवले होते. पण जेव्हा त्याची संघाला गरज होती तेव्हा त्याने पीटरसनला पुन्हा संघात दाखल करून घेतले आणि पीटरसननेही कुकने ठेवलेला विश्वास सार्थ करून दाखवला.
या साऱ्या गोष्टींमुळे कुक अनेकांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. त्यामुळे आता त्याच्या अखेरच्या खेळीवर साऱ्यांच्या नजरा असतील. पहिल्या सामन्यात त्याने जसे शतक झळकावले, तसे ते अखेरच्या सामन्यात व्हावे, अशी चाहत्यांची इच्छा असेल. एका सभ्य गृहस्थाला यापुढे क्रिकेट मुकणार, ही सल कायम मनात ठेवून सारेच कुकला निरोप देऊया. पण त्याने आपल्या फलंदाजीतून दिलेला आनंद हा चीरतरुण राहील, एवढे मात्र नक्की.