Join us  

India vs England: भारतीय संघाला अजून एक धक्का

अश्विन पहिल्या सामन्यात खेळणार की नाही, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 4:41 PM

Open in App
ठळक मुद्देभारताचा फिरकीपटू आर. अश्विन जायबंदी झाला असून मालिकेपूर्वीच जायबंदी झालेला हा भारताचा चौथा खेळाडू ठरला आहे.

लंडन : इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघाला अजून एक धक्का बसला आहे. सराव सामन्यात भारताचा फिरकीपटू आर. अश्विन जायबंदी झाला असून मालिकेपूर्वीच जायबंदी झालेला हा भारताचा चौथा खेळाडू ठरला आहे.

आयपीएलनंतर यष्टीरक्षक वृद्धिमान साहा जायबंदी झाला होता. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. पण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्यावर चुकीचे उपचार केले गेले आणि त्यानंतर त्याचा खांदा जायबंदी झाला. त्यामुळे त्याला खांद्यावर शस्त्रक्रीया करावी लागली. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला काही महिने लागणार आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्याही अंगठ्यासा दुखापत झाली आहे. त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली असली तरी त्याचे पुनर्वसन व्हायला बराच वेळ लागणार आहे. भारताचा स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमारही कंबरेच्या दुखण्याने त्रस्त आहे. त्यानंतर सराव सामन्यात अश्विनला दुखापत झाली आहे.

इसेक्सविरुद्धच्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी अश्विनच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. या दुखापतीनंतर अश्विनला फलंदाजी आणि गोलंदाजी करता आलेली नाही. काही जणांना अश्विनला विश्रांती दिली, असे वाटत होते. पण त्याच्या या दुखापतीवर सध्या उपचार सुरु आहेत. त्याची ही दुखापत गंभीर स्वरुपाची नसल्याचे संघ व्यवस्थापन सांगत आहे, पण अश्विन पहिल्या सामन्यात खेळणार की नाही, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

टॅग्स :आर अश्विनभारत विरुद्ध इंग्लंडजसप्रित बुमराह