ठळक मुद्देआपल्या मर्जीसाठी त्यांनी अश्विन फिट नसतानाही त्याला खेळवले आणि त्याचे परिणाम भारतीय संघाला भोगावे लागले.
लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : प्रत्येक सामन्यापूर्वी खेळाडू फिट आहे की नाही, हे प्रत्येक संघ पाहत असतो. जर एखादा खेळाडू फिट नसेल तर त्याला संघात स्थान दिले जात नाही. पण भारताच्या संघाच्या बाबतीत वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली. भारताचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विन पूर्णपणे फिट नव्हता, पण तरीदेखील कर्णधार विराट कोहलीने त्याला खेळवण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त एका खासगी संकेतस्थळाने दिले आहे.
आतापर्यंत कोहलीने कसोटी संघात वारंवार बदल केले होते. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ही गोष्ट थांबली. संघात बदल न करण्याची ही कोहलीची पहिलीच वेळ होती. भारताने तिसरा सामना जिंकला होता. त्यामुळे कोहलीने चौथ्या सामन्यात संघात बदल केला नाही. पण सामन्यापूर्वी एखादा खेळाडू फिट आहे की नाही, तो खेळू शकतो की नाही, हे पाहणे कोहलीचे काम आहे. पण कोहली मात्र या गोष्टींमध्ये सपशेल अपयशी ठरल्याचेच दिसत आहे.
फिट नसतानाही अश्विनला खेळवले आणि त्यामुळेच त्याच्याकडून चांगली कामगिरी झाली नाही. पहिल्या डावात 40 धावा देऊन अश्विनने दोन बळी मिळवले. दुसऱ्या डावात तर अश्विनला फक्त एक फलंदाज बाद करता आला, यासाठी त्याला 84 धावा द्याव्या लागल्या.
अश्विनला तिसऱ्या सामन्यानंतर दुखापत झाली होती. त्याचे मांडीचे स्नायू दुखावले होते. चौथ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला वैद्यकीय चाचणीनंतर अश्विनला पाच दिवसांची विश्रांती देण्यात यावी, असा सल्ला देण्यात आला होता. पण कोहली आणि संघ व्यवस्थापनाने वैद्यकीय चाचणीचा अहवाल कुणाला सांगितला नाही. आपल्या मर्जीसाठी त्यांनी अश्विन फिट नसतानाही त्याला खेळवले आणि त्याचे परिणाम भारतीय संघाला भोगावे लागले.
Web Title: India vs England: Ashwin has played against england even when he is not fit
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.