लंडन : इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका अजून सुरु झाली नसली तरी त्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या अंगठ्यावरील शस्त्रक्रीया यशस्वी ठरलेली नाही. या दुखापतीतून बाहेर पडण्यासाठी बुमराला जवळपास एक महिना विश्रांती घ्यावी लागू शकते. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला बुमराला मुकावे लागेल, असे म्हटले जात आहे.
आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यादरम्यान बुमराच्या डाव्य हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यावेळी त्याचा हा अंगठा फ्रॅक्चर झाल्याचे संघ व्यवस्थापनाने सांगितले होते. त्यामुळे बुमराला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत स्थान देण्यात आले नव्हते. या दरम्यान संघाच्या फिजिओने बुमराच्या अंगठ्यावर शस्त्रक्रीया करण्यात यावी, असा सल्ला दिला होता.
फिजिओच्या सल्ल्यानुसार बुमराच्या अंगठ्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली. पण बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने ही शस्त्रक्रीया अपेक्षेनुरुप यशस्वी झाली नसल्याचे सांगितले आहे. बुमराला जवळपास 4-5 आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे बुमराला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागण्याची दाट शक्यता आहे.