Join us  

India VS England: सर्वात मोठे पुनरागमन- लक्ष्मण

ट्रेंटब्रिजच्या कसोटी विजयाला भारताच्या कसोटी इतिहासातील सर्वांत मोठे पुनरागमन संबोधावे लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 6:04 AM

Open in App

ट्रेंटब्रिजच्या कसोटी विजयाला भारताच्या कसोटी इतिहासातील सर्वांत मोठे पुनरागमन संबोधावे लागेल. लॉर्डस्वर हरल्यानंतर ०-२ अशी माघार झाली होती. पण खेळाडूंनी कौशल्य पणाला लावून मुसंडी मारली आणि पुनरागमन करण्यास स्वत:ला झोकून दिले. सुरुवातीपासून यजमान संघावर दडपण आणून मालिकेत चुरस कायम राखली आहे.हा निकाल भारताची फलंदाजी सुधारल्याचे प्रतीक आहे. धवन आणि लोकेश राहुल या दोन्ही सलामीवीरांनी सकारात्मकता दाखविल्यानंतर पुजारा आणि रहाणे यांनी मोठा काळ खेळपट्टीवर घालविला. हे सुधारणेचे प्रतीक म्हणावे लागेल. विदेशात खेळताना स्वत:चे कौशल्य आणि क्षमता यावर विश्वास असावा लागतो. भारतीय फलंदाजीचा कणा कोण, यावर कुठलेही भाष्य होऊ नये. कर्णधार कोहलीने कधीही निराश केले नाही. आव्हानात्मक स्थितीत विराटच्या शिस्तीचे दर्शन घडले. मालिकेत सहाव्या डावात त्याने भरपूर धावा वसूल केल्या. त्याच्या मानसिक दृढतेला सलाम.माझ्या पुस्तकात तरी विराट महान व जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतो. यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या कामगिरीवरही मी खूश आहे, याशिवाय स्लिप व क्षेत्ररक्षणातील कामगिरीने मला प्रभावित केले. गोलंदाजांचे जितके कौतुक करावे ते थोडे आहे. बुमराहच्या पुनरागमनामुळे सहकाऱ्यांना ऊर्जा मिळाली. ईशांतचे सातत्यही कमी नव्हते. गोलंदाजीला धार आणण्यासाठी त्याने कठोर मेहनत घेतली आहे. स्विंग आणि सीम या दोन्ही बाबतीत दीर्घ काळानंतर ईशांतला यशस्वी होताना पाहिले. अष्टपैलू म्हणून या मालिकेत हार्दिक पांड्या निर्णायक सिद्ध होईल.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहली