सध्याच्या घडीला क्रिकेट चाहत्यांना वेध लागले आहेत ते इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेचे. या मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या किती धावा होतील, याची उत्सुकता साऱ्यांना आहे. कारण गेल्या दौऱ्यातील पाच सामन्यांमध्ये कोहलीला फक्त 134 धावाच करता आल्या होत्या. या दौऱ्यात कोहली कोणत्या पद्धतीने बाद होऊ शकतो, त्याचे हे विश्लेषण.
कोहलीने आतापर्यंत धावांचे बरेच इमले रचले आहेत. पण तरीही इंग्लंड दौरा हा शंभर कसोटी सामने खेळलेल्या भारतीय खेळाडूलाही आव्हानात्मक असतो. त्यामुळे ही कसोटी मालिका कोहलीसाठी नक्कीच मोठे आव्हान असेल. कोहलीला झटपट बाद कसे करायचे, याची रणनीती इंग्लंडने आखली असेलच. त्याच्या फलंदाजीतील काही कच्चे दुवे या कसोटी मालिकेत समोर येऊ शकतात आणि त्यामुळेच मोठी खेळी साकारण्यापासून तो वंचित ठरू शकतो.
विराट कोहलीसाठी सर्वात घातक गोष्ट म्हणजे ऑफ स्टम्पच्या बाहेर पडणारे चेंडू. गेल्या दौऱ्यात कोहलीच्या पाचवीला नेमकी हीच गोष्ट पुजलेली होती. ऑफ स्टम्पच्या बाहेर किती चेंडू सोडायचे आणि कसे सोडायचे, यावर कोहलीने विचार करायला हवा. तुम्हाला या दौऱ्यातला दुसरा एकदिवसीय सामना आठवत असेल तर ऑफ स्टम्प बाहेरचा चेंडू खेळताना कोहलीचा झेल उडाला होता. पण त्यावेळी एकही स्लीप नसल्याने कोहली बचावला. खरेतर कोहलीने ही गोष्ट गेल्या चार वर्षांमध्ये शिकायला हवी होती, पण त्याच्याकडून तसे झाले नाही.
कोहली हा आक्रमक फलंदाज आहे, पण त्याच्याकडे अजूनही उत्तम बचाव नाही. उसळत्या चेंडूवर कसा बचाव करायचा, हे कोहलीला अद्यापही माहिती नसावे. कारण प्रत्येक उसळत्या चेंडूवर तो मोठे फटके मारतो. जेव्हा तुम्ही क्रीझवर नुकतेच आलेले असता, तेव्हा उसळत्या चेंडूवर हुक आणि पूरचे फटके मारणे सोपे नसते. त्यामुळे ही गोष्ट देखील कोहलीसाठी घातक ठरू शकते.
इंग्लंडकडे जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड हे दोन चांगले वेगवान गोलंदाज आहेत. कोहलीच्या पायाजवळ आलेला चेंडू तो नेहमीच फ्लिक करायला बघतो. यावेळी जर चेंडूच्या वेगात बदल झाला आणि तो कोहलीला कळला नाही तर तो पायचीत होऊ शकतो. त्याचबरोबर अँडरसन हा चांगला रिव्हर्स स्विंग करू शकतो. त्यामुळे एखादा चेंडू अनपेक्षितपणे त्याच्या पायाजवळ आला तर तो पायचीत होऊ शकतो.
एखादा थोडासा उसळता चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर असेल तर कोहली तो फटका पॉइंट किंवा कव्हर्सच्या दिशेने फटकावण्याचा प्रयत्न करतो. यावेळी जर चेंडूने बॅटची कड घेतली तर कोहली त्रिफळाचीत होऊ शकतो. ही गोष्ट जेव्हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर असेल आणि चेंडूचा वेग कमी असेल, तेव्हा देखील कोहली त्रिफळाचीत होण्याची भिती असेल.
इंग्लंडच्या दौऱ्यात तुमच्याकडे चांगले फलंदाजीचे तंत्र असायला हवे. त्याचबरोबर तुमची मानसीकता कशी आहे, हेदेखील महत्त्वाचे ठरते. कोहलीच्या या दोन्ही गोष्टींमध्ये बदल झालेला दिसत नाही. पण भारतीयांना वाटत असेल की कोहलीने धावांचा डोंगर रचावा, तर या गोष्टी करणे त्याला भाग असेल.