चेन्नई : पाच फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारत आणि इंग्लड संघ चेन्नईत विलगीकरणात आहेत. दोन्ही संघांतील खेळाडूंची दुसरी कोरोना चाचणी सोमवारी निगेटिव्ह आली. आता उभय संघ आज, मंगळवारपासून प्रत्यक्ष सरावात सहभागी होऊ शकतील. खेळाडूंना सहा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपला आहे. खेळाडू आऊटडोअर आणि नेटमध्ये सराव करू शकतील. मालिकेतील पहिले दोन्ही सामने चेन्नईतील चेपॉक मैदानावर होणार आहेत. त्यानंतरचे दोन्ही सामने अहमदाबाद येथे होतील. कसोटी मालिका ८ मार्च रोजी संपणार असून, १२ मार्चपासून टी-२० आणि २३ मार्चपासून वन-डे मालिका खेळविली जाईल. २८ मार्च रोजीे दौऱ्याची सांगता होणार आहे.
ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक मालिका विजय नोंदविणाऱ्या भारतीय खेळाडूंना येथे क्वारंटाईन होण्याआधी कुटुंबासोबत वेळ घालविण्याची संधी मिळाली होती. बुधवारी आगमन झाल्यानंतर सर्व खेळाडूंना वेळोवेळी आरटीपीसीआर चाचणीस सामोरे जावे लागले. चाचण्या यशस्वी झाल्यामुळे आता तीन दिवस सराव करता येईल.
दरम्यान, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि रोरी बर्न्स हे इंग्लंड संघासोबत लंका दौऱ्यावर गेले नव्हते. ते थेट भारतात दाखल झाले. त्यांचा आधीपासून सराव सुरू आहे. संपूर्ण संघ आज दुपारी दोन वाजेपासून सराव करेल, असे बीसीसीआयने म्हटले आहे.
Web Title: India VS England : Corona test of India-England players is negative, practice will start from today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.