India vs England: भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा झाली आहे. लॉर्ड्स वरील पराभव इंग्लंडच्या चांगलाच जिव्हारी लागला असून संघात एक महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. मर्यादित षटकांमध्ये अव्वल दर्जाचा फलंदाज डेव्हिड मलान याला इंग्लंडनं पाचारण केलं आहे. इंग्लंडच्या डोम सिबलेच्या जागी डेव्हिड मलान याला संधी देण्यात आली आहे.
सिबले याला गेल्या १५ इनिंग्जमध्ये केवळ एका इनिंगमध्येच वैयक्तिक ३५ धावसंख्येच्या वर खेळी साकारता आली आहे. यंदाच्या वर्षात एकूण १० कसोटी सामन्यांमध्ये त्यानं केवळ १९.७७ च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. सिबलेच्या याच निराशाजनक कामगिरीमुळे त्याला भारतीय संघाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर डावखुऱ्या आक्रमक डेव्हिड मलान याला संघात समाविष्ट करुन घेण्यात आलं आहे.
डेव्हिड मलान संघात तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला उतरण्याची शक्यता आहे. तर हसीब हमीद आणि रोरी बर्न्स इंग्लंडकडून सलामीला उतरतील. ओली पोप याचाही संघात समावेश करण्यात आला असून तो मधल्या फळीत खेळताना दिसू शकतो. दुसऱ्या कसोटीत खांद्याला झालेल्या दुखापतीनंतरही मार्क वुड याचा संघात समावेश करण्यात आलेला आहे. पण अंतिम ११ जणांमध्ये त्याचा समावेश होण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे. वैद्यकीय टीम मार्क वूडच्या दुखापतीवर लक्ष ठेवून असून कसोटी सुरू होईपर्यंत तो फीट होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
असा आहे इंग्लंडचा संघ-जो रूट (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), डेव्हिड मलान, मोइन अली, सॅम कुरन, क्रेग ओवरटोन, जेम्स अँडरसन, हसीब हमीद, ओली पोप, जॉनी बेअरस्टो, डॅन लॉरेन्स, ओली रॉबिन्सन, रोरि बर्न्स, सकिब महमूद, मार्क वूड