नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात महेंद्रसिंग धोनीवर टीका झाली. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात धोनीने पंचांकडून चेंडू मागून घेतला आणि त्याच्या निवृत्तीच्या बातम्यांचा पूर आला. आता तर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने, धोनीचं वय झालंय, असं म्हणत त्याच्यावर तोफ डागली आहे.
सुरुवातीला काही चेंडू सावधपणे खेळून काढायचे आणि स्थिरस्थावर झाल्यावर धावगती वाढवायची, हे धोनीचं फलंदाजीचं तंत्र आहे. धोनीने हे तंत्र इंग्लंडमध्येही वापरलं. पण त्यामध्ये तो अपयशी ठरला. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात धोनी स्थिरस्थावर झाला खरा, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. सेहवागनेही याच गोष्टीवर बोट ठेवलं आहे.
सेहवाग म्हणाला की, " पूर्वीचा धोनी आता पाहायला मिळत नाही. त्याचं आता वयंही झालं आहे. वयानुसार त्याच्या खेळात बदल झाला आहे. धोनीने खरंतर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अखेरच्या षटकापर्यंत फलंदाजी करणं, गरजेचं होतं. पण त्याला तसं करता आलं नाही. "