अहमदाबाद : फिरकीपटू अक्षर पटेल याने केलेल्या भेदक फिरकीपुढे इंग्लंडचे फलंदाज ढेपाळले. इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या ११२ धावांमध्ये संपुष्टात आणताना यजमान भारताने तिसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी आपली पकड घट्ट केली. भारताने खेळ संपेपर्यंत तीन गड्यांच्या मोबदल्यात ९९ धावा केल्या. भारतीय संघ १३ धावांनी मागे असून सात फलंदाज शिल्लक आहेत. रोहित शर्मा ५७ आणि अजिंक्य रहाणे एक धाव काढून नाबाद होते. त्याआधी कर्णधार विराट कोहली २७ धावा काढून बाद झाला.
कारकीर्दीतील दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या अक्षर पटेलने आपल्या चमकदार फिरकीच्या जोरावर इंग्लंडला बॅकफूटवर आणले. नाणेफेक जिंकून इंग्लंडने अपेक्षेप्रमाणे प्रथम फलंदाजी घेतली. यावेळी, भारतीयांवर नाणेफेक गमावल्याचे दडपणही होते. परंतु, शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या ईशांतने तिसऱ्याच षटकात भारताला पहिले यश मिळवून देताना सलामीवीर डॉम सिब्ले (०) याला भोपळाही फोडू दिला नाही. यानंतर ठराविक अंतराने इंग्लंडला धक्के बसत गेले.
यामध्ये त्यांची दाणादाण उडवली ती पटेलने. त्याने झॅक क्रॉवली, जॉनी बेयरस्टॉ, बेन स्टोक्स, बेन फोक्स, जोफ्रा आर्चर आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना बाद करत इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. विशेष म्हणजे आपल्या पहिल्याच चेंडूवर पटेलने धोकादायक बेयरस्टॉला पायचीत पकडत इंग्लंडवर दडपण टाकले. यावेळी, बेयरस्टॉने डीआरएसही घेतला, मात्र निर्णय भारताच्या बाजूने लागल्याने इंग्लंडने एक रिव्ह्यूही गमावला.
एकीकडे पटेलच्या फिरकीपुढे भंबेरी उडत असताना दुसरीकडे, अनुभवी रविचंद्रन अश्विननेही इंग्लिश साहेबांना चांगलेच नाचवले. अश्विनने कर्णधार जो रुट, ओली पोप आणि जॅक लीच यांना बाद करून इंग्लंडला पूर्णपणे बॅकफूटवर नेले. त्याने २६ धावांत ३ मोहरे टिपले. दोन्ही बाजूंनी फिरकी माऱ्याचे दडपण इंग्लंडला न पेलविल्याने त्यांची ९८ धावांत ८ बाद अशी केविलवाणी अवस्था झाली होती. युवा सलामीवीर क्रॉवलीने एकाकी झुंज देताना ८४ चेंडूंत १० चौकारांसह ५३ धावांची लढत दिली. मात्र, त्याला दुसऱ्या टोकाकडून योग्य साथ मिळाली नाही.
यानंतर भारताने डीनर ब्रेकपर्यंत बिनबाद ५ धावा अशी सुरुवात करत कोणताही धोका पत्करला नाही. भारतीयांनी अत्यंत सावध पवित्रा घेत पहिल्या १० षटकांत केवळ १४ धावा केल्या. त्यानंतर मात्र शुभमान गिल ११ धावांवर तर चेतेश्वर पुजारा भोपळा न फोडताच माघारी फिरला. कर्णधार विराट कोहली दिवसाचा खेळ संपता संपता २७ धावा काढून परतला. इंग्लंडकडून जॅक लीचने दोन तर जोफ्रा आर्चर याने एक गडी बाद केला.
- भारताविरुद्ध इंग्लंडचा चौथ्या क्रमांकाचा नीचांक.
- दिवस-रात्र कसोटी सामन्यात अक्षर पटेलची कामगिरी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम ठरली.
- पहिल्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा देवेंद्र बिशू असून त्याने पाकिस्तानविरुद्ध २०१६-१७ साली ४९ धावांत ८ बळी घेतले होते.
- कसोटी पदार्पण केल्यानंतर सलग दुसऱ्या सामन्यात अक्षर पटेलने अर्धा संघ बाद करण्याचा पराक्रम केला.
- भारत दौऱ्यावर आलेल्या संघाकडून दुसऱ्या क्रमांकाचा नीचांक. पहिल्या क्रमांकावर बांगलादेश असून २०१९ साली त्यांचा डाव १०६ धावांत संपुष्टात आला होता.
- सर्वाधिक आंतरराष्ट्रीय बळी मिळवणाऱ्या भारतीयांमध्ये रविचंद्रन अश्विनने झहीर खानला मागे टाकत चौथे स्थान पटकावले.
शंभर कसोटी खेळणारा ईशांत अकरावा भारतीय ठरला.
धावफलक
इंग्लंड पहिला डाव : जॅक क्राऊली पायचित गो. अक्षर पटेल ५३, डोम सिब्ली झे. रोहित गो. ईशांत ००, जॉनी बेयरेस्टॉ पायचित गो. पटेल ००, ज्यो रूट पायचित गो. अश्विन १७, बेन स्टोक्स पायचित गो. पटेल ६, ओली पोप त्रि.गो. अश्विन १, बेन फॉक्स त्रि.गो.पटेल १२, जोफ्रा आर्चर त्रि.गो. पटेल ११, जॅक लीच झे. पुजारा गो. अश्विन ३, स्टुअर्ट ब्रॉड झे. बुमराह गो. पटेल ३, जेम्स ॲन्डरसन नाबाद ००, अवांतर ६, एकूण धावा : ४८.४ षटकात सर्व बाद ११२. गडी बाद क्रम : १/२, २/२७, ३/७४, ४/८०, ५/८१, ६/८१, ७/९३, ८/९८, ९/१०५, १०/११२. गोलंदाजी : ईशांत ५-१-२६-१, बुमराह ६-३-१९-०, पटेल २१.४-६-३८-६, अश्विन १६-६-२६-३.
भारत पहिला डाव : रोहित शर्मा खेळत आहे ५३, शुभमन गिल झे.क्राऊली गो. आर्चर ११, पुजारा पायचित गो. लीच ००, विराट कोहली त्रि. गो. लीच २७, रहाणे खेळत आहे १, अवांतर: ३, एकूण धावा : ३३ षटकात ३ बाद ९९. गडी बाद क्रम: १/३३,२/३४. ३/९८. गोलंदाजी: ॲन्डरसन ९-६-११-०, ब्रॉड ६-१-१६-०, आर्चर ५-२-२४-१, लीच १०-१-२७-२, स्ट्रोक्स ३-०-१९-०.
Web Title: India VS England: English batsmen's 'garba' on akshar patel spin
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.