लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 1 ऑगस्टपासून बर्मिंमहमला सुरु होणार आहे. आतापर्यंत बर्मिंमहमच्या मैदानात भारताला एकदाही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळेच हा सामना जिंकणं, भारतासाठी फार कठिण असेल. पण जर भारताने हा सामना जिंकला तर तो ऐतिहासिक विजय होऊ शकतो.
आतापर्यंत बर्मिंमहमच्या मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सहा सामने झाले आहेत. या सहापैकी एकही सामना भारताला जिंकता आलेला नाही. या सहापैकी इंग्लंडने पाच सामने जिंकले आहेत, तर एक सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे या मैदानात भारताच्या पराभवाची टक्केवारी 83 एवढी आहे.
या मैदानात भारताचा पहिला सामना 1967मध्ये खेळला गेला होता. या सामन्यात भारताला इंग्लंडकडून 132 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्याचबरोबर या मैदानात भारताचा अखेरचा सामना 2011 साली खेळवला गेला होता. या सामन्यात भारताला एक डाव आणि 242 धावांनी मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी संघाचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीकडे होते. त्याचबरोबर संघात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मणसारखे दिग्गज फलंदाज होते. इंग्लंडने या सामन्यातील पहिला डाव 710 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर भारताचे दोन्ही डाव अमुक्रमे 224 आणि 244 धावांवर आटोपले होते.
इंग्लंडने या मैदानात 50 कसोटी सामने खेळले आहेत. या 50 सामन्यांपैकी इंग्लंडने 27 सामने जिंकले आहेत, तर आठ सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे या मैदानात इंग्लंडची कामगिरी चांगली झाली असली तरी भारताला मात्र एकही विजय मिळवता आला नाही. त्यामुळे भारतासाठी पहिलाच पेपर कठिण असल्याचे दिसत आहे.