मुंबई: इंग्लंडविरुद्धचा तिसरा टी-20 सामना जिंकून भारतानं मालिका 2-1 नं खिशात घातली. भारतानं सात गडी आणि आठ चेंडू राखून इंग्लंडचा पराभव केला. इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडला पराभूत करणाऱ्या भारतीय संघाचं अनेकांनी अभिनंदन केलं आहे. विशेष म्हणजे या विजयासह कोहलीच्या संघानं सलग सहा टी-20 मालिका जिंकण्याची कामगिरी करुन दाखवली आहे.
भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग त्याच्या हटके ट्विट्ससाठी ओळखला जातो. काल भारतीय संघानं इंग्लंडला धूळ चारताच वीरूनं त्याच्या स्टाईलमध्ये संघाचं अभिनंदन केलं. भारतीय फलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीचं वीरूनं तोंडभरून कौतुक केलं. त्यानं ट्विटमध्ये अष्टपैलू हार्दिक पांड्याचा विशेष उल्लेख केला आहे. सेहवागनं पांड्याला कुंफू पांडा म्हटलं आहे. हार्दिकनं फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी केली, अशी स्तुतीसुमनं सेहवागनं उधळली आहेत.
हार्दिक पांड्यानं 38 धावांमध्ये इंग्लंडच्या 4 फलंदाजांना बाद केलं. पांड्यानं त्याच्या शानदार गोलंदाजीनं इंग्लंडच्या मधल्या फळीला धक्के दिले. त्यानं धोकादायक अॅलेक्स हेल्स, कर्णधार इयन मॉर्गन, बेन स्टोक्स आणि जॉनी बेरस्टॉला तंबूचा रस्ता दाखवला. इंग्लंडच्या मधल्या फळीतील एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारणार नाही, याची काळजी पांड्यानं घेतली. यानंतर त्यानं फलंदाजातही चमकदार कामगिरी केली. विराट कोहली बाद झाल्यावर मैदानावर उतरलेल्या पांड्यानं अवघ्या 14 चेंडूंमध्ये 33 धावा चोपून काढल्या. यामध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.
Web Title: india vs england former cricketer virendra sehwag gives special name to hardik pandya
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.