Join us  

पाहुणा इंग्लंड भारताविरुद्ध एकही कसोटी जिंकणार नाही, गौतम गंभीरचे मालिकेआधीच भाकीत

India VS England : दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाचा फिरकी मारा पाहून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत हा संघ भारताविरुद्ध एक तरी विजय मिळवेल, असे वाटत नसल्याचे भाकीत माजी सलामीवीर गौतम गंभीर याने सोमवारी केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 2:06 AM

Open in App

मुंबई : दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाचा फिरकी मारा पाहून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत हा संघ भारताविरुद्ध एक तरी विजय मिळवेल, असे वाटत नसल्याचे भाकीत माजी सलामीवीर गौतम गंभीर याने सोमवारी केले. स्टार स्पोर्ट्‌सच्या ‘गेम प्लान’ या कार्यक्रमात बोलताना गंभीर म्हणाला, ‘इंग्लंडने मोईन अली, डोम बेस आणि जौक लीच या फिरकीपटूंना संघात स्थान दिले. अनुभवी मोईनने ६० सामन्यांत १८१ गडी बाद केले, पण बेस आणि लीच हे प्रत्येकी १२-१२ सामने खेळले. बेसने  ३१ तर लीचने ४४ गडी बाद केले आहेत. इंग्लंडने सहभागी केलेले हे फिरकी गोलंदाज सामने जिंकून देतील, असे वाटत नाही. माझ्या मते पाहुणा संघ एकही कसोटी सामना जिंकू शकणार नाही.’‘भारतीय संघ आगामी मालिका ३-० किंवा ३-१ने जिंकू शकेल. दिवस-रात्र रंगणाऱ्या एका कसोटीत इंग्लंडला ५० टक्के विजयाची संंधी असेल. श्रीलंकेत धडाकेबाज फलंदाजी करणारा कर्णधार ज्यो रुट याला भारतात विविध समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. लंकेला इंग्लंडने २-०ने सहज नमविले असले तरी येथे रुटला वेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागेल. जसप्रीत बुमराह आणि रवीचंद्रन अश्विन यांच्या माऱ्यापुढे खेळणे सोपे जाणार नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात या दोन्ही गोलंदाजांनी यशस्वी कामगिरी केली हे विसरता येणार नाही,’ असे ३९ वर्षांच्या गंभीरने म्हटले आहे. मालिकेतील पहिले दोन्ही सामने चेन्नईत रंगणार आहेत. तिसरा आणि चौथा सामना अहमदाबाद येथे होईल. 

यातील तिसरी कसोटी गुलाबी चेंडूने खेळली जाणार आहे. विराट कोहली हा ऑस्ट्रेलियात पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर पितृत्व रजेवर मायदेशात परतला होता. भारतीय संघाने चार सामन्यांची मालिका २-१ने जिंकली होती. इंग्लंडविरुद्ध चार सामन्यांच्या मालिकेत मात्र विराट हाच संघाचे नेतृत्व करणार आहे. विराटच्या टी-२० तील नेतृत्वावर प्रश्नचिन्ह‘मी कधीही कसोटी आणि वनडेतील विराट कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही. टी-२० सामन्यातील त्याच्या नेतृत्वावर मात्र प्रश्नचिन्ह उभे राहते. विराट नेतृत्वकर्ता खेळाडू आहे, असे मी वारंवार म्हणतो. कसोटीतही त्याची कामगिरी अधोरेखित झालीच आहे. वन डेतही त्याची कामगिरी चांगलीच आहे. मात्र मी नेहमी त्याच्या टी-२०तील नेतृत्वाविषयी प्रश्न उपस्थित करतो. लाल चेंडूच्या खेळात त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ सतत प्रगतिपथावर असेल,’ असा विश्वास वाटत असल्याचे देशाकडून ५८ कसोटी आणि १४७ वन डे खेळलेल्या गंभीरने सांगितले.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडगौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघ