लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : भारताचा अष्टपैलू हनुमा विहारी हा आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याला अशा एका प्रसंगाला सामोरे जावे लागले की अन्य खेळाडूंनाही भिती वाटली. क्षेत्ररक्षण करत असताना हनुमाला डोळ्याजवळ चेंडू लागला आणि त्यावेळी सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला.
ही गोष्ट आहे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या सामन्याची. या सामन्यात इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत होता. अॅलिस्टर कुक आणि जो रुट बाद होऊन तंबूत परतले होते. त्यावेळी बेन स्टोक्सच्या बॅटमधून निघालेला एक फटका हनुमाला चांगलाच बसला.
रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीपुढे स्टोक्स हा फलंदाजी करत होता. तेव्हा हनुमा हा शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी स्टोक्सने एक जोरदार फटका मारला. त्यावेळी तो चेंडू हनुमाच्या हॅल्मेटमधून आत शिरला आणि थेट हनुमाच्या डोळ्याच्या थोडा वर लागला. त्यावेळी हनुमा चांगलाच कळवळला. ते पाहून पहिल्यांदा स्टोक्स त्याच्याकडे धावून गेला. त्यानंतर भारतीय संघाने त्याच्याकडे धाव घेतली. भारताचे फिजिओदेखील कसलीही वाट न पाहता मैदानात धावत आले. हनुमाने हॅल्मेट काढलं, पण सुदैवाने त्याला जास्त दुखापत झाली नव्हती.