मुंबई, भारत विरुद्ध इंग्लंड : भारताला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागला आणि आता संघावर टीकेची झोड उठते आहे. भारताच्या गोलंदाजांनी या मालिकेत चांगली कामगिरी केली, पण तरीही भारत का पराभूत झाला, याचं उत्तर आहे सलामीवीरांमुळे. कारण आतापर्यंत झालेल्या चार कसोटी सामन्यांमध्ये एकाही सलामीवीराला अर्धशतक झळकावता आले नाही. ही खरंतर नामुष्की आहे. शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल हे तिन्ही फलंदाज या मालिकेत फ्लॉप ठरले आहेत. पण हे सलामीचं कोडं लवकरच भारतीय संघ व्यवस्थापनाने सोडवायला हवं.
परदेशातील खेळपट्ट्यांवर धवन हा सातत्याने अपयशी ठरताना आपण पाहिला आहे. कसोटी मालिकेपूर्वी झालेल्या सराव सामन्यात धवनला दोन्ही डावांत एकही धाव करता आली नव्हती. तरी शास्त्री गुरुजींच्या आशिर्वादाने तो संघात कायम राहीला. पहिल्या कसोटी सामन्यात 26 आणि 13 अशा धावा त्याने केल्या. या सुमार कामगिरीमुळे धवन आणि संघ व्यवस्थापनावर टीका व्हायला लागली. त्यामुळे धवनला लॉर्ड्सवरच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वगळण्यात आले. पण दुसऱ्या सामन्यात विजय अपयशी ठरला आणि धवनची पुन्हा एकदा संघात वर्णी लागली. तिसऱ्या कसोटी सामन्यात धवनने 35 आणि 44 धावा केल्या. आता धवन अर्धशतक तरी झळकावेल, असे वाटत होते. पण तसे झाले नाही. चौथ्या सामन्यात 23 आणि 17 अशा धावा करून तो बाद झाला.
मुरली विजय, हा एक शैलीदार सलामीवीर आहे. भारतीय संघ जेव्हा 2014 साली इंग्लंडच्या दौऱ्यावर आला होता तेव्हा विजयने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे या मालिकेत विजय संघाला तारेल असे, वाटत होते. पण पहिल्या सामन्यात 20 आणि 6 धावाच करता आल्या. तरीही दुसऱ्या सामन्यात त्याला एक संधी देण्यात आली. लॉर्ड्सवरच्या दुसऱ्या सामन्यातील दोन्ही डावांमध्ये विजयला भोपळाही फोडता आला नाही. दोन कसोटी सामन्यांमध्ये फक्त 26 धावाच विजयला करता आल्या.
लोकेश राहुल, हा कर्णधार विराट कोहलीचा आवडता खेळाडू आहे. हे सर्वश्रूत आहेच, सांगणे न बरे. कारण चांगली फलंदाजी होत नसतानाही राहुलला चारही सामन्यांमध्ये खेळवण्यात आले. पहिल्या सामन्यात राहुल जास्त धावा करण्यात अपयशी ठरला होता. पहिल्या सामन्यात 4 आणि 13 अशा त्याच्या धावा होत्या. ज्या नियमाने धवनला दुसऱ्या सामन्यात संघातून बाहेर काढले, तसे राहुललाही काढायला हवे होते, पण तसे झाले नाही. दुसऱ्या सामन्यात राहुलने 8 आणि 10 धावा केल्या. पहिल्या दोन्ही सामन्यात एक सलामीवीर म्हणून तो अपयशी ठरला होता. पण कोहलीच्या मेहेरबानीने राहुल तिसऱ्या कसोटीत खेळला आणि 23 आणि 36 अशा धावा त्याने केल्या. चौथ्या कसोटी सामन्यात त्याच्या खात्यात 19 आणि 0 अशा धावा होत्या.
आतापर्यंत चार सामन्यांमध्ये भारताचे तिन्ही सलामीवीर लैकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेले नाहीत. खरंतर पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात सलामीवीर अपयशी ठरत असताना संघ व्यवस्थापनाने पर्याय शोधायला हवा होता. पण भारताचा कर्णधार, प्रशिक्षक सारेच एका वेगळा अहंकारात वावरत होते. त्याचाच परिपाक मालिका गमावण्यात झाला. सलामीवीर म्हणून कोणते पर्याय संघ व्यवस्थापन हाताळू शकते, हे आपण पाहूया.
अजिंक्य रहाणे : अजिंक्य रहाणे हा तंत्रशुद्ध फलंदाज आहे. मुंबईकडून खेळताना त्याने डावाची सुरुवात केली आहे. त्यामुळे जेव्हा भारतीय सलामीवीर अपयशी ठरत होते तेव्हा अजिंक्य रहाणेला सलामीवीर म्हणून पाठवता येऊ शकले असते. मधल्या फळीत अजिंक्यला लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. त्यामुळे त्याला सलामीला पाठवून संघात थोडा बदल करता आला असता.
चेतेश्वर पुजारा : चेतेश्वर पुजारा हा संघात दुसरा तंत्रशुद्ध फलंदाज आहे. त्याचाही सलामीवीर म्हणून विचार करायला हवा होता. पहिल्या कसोटीला त्याला वगळून संघाने घोडचूक केली होती. तोच पुजारा तुमच्यासाठी धावून आला होता. चारही सामन्यात भारताचे सलामीवीर जास्त काश टिकले नाहीत. त्यानंतर पुजाराच फलंदाजीला यायचा. त्यामुळे नव्या चेंडूचा सामना कसा करायचा, हे त्याला चांगलेच माहिती आहे. त्यामुळे पुजारा हा सलामीसाठी चांगला पर्याय असू शकला असता.
रिषभ पंत : रिषभ पंत हा आक्रमक फलंदाज आहे. त्यामुळे तळाला त्याला आक्रमक फलंदाजी करता येणार नव्हती. पंत आतापर्यंत बचावात्मक खेळ करताना बाद झाला आहे. त्यामुळे जर त्याला सलामीली पाठवले असते आणि वीरेंद्र सेहवागसारखे आक्रमक खेळायला पाठवले असते, तर कदाचित भारताच्या धावा जास्त होऊ शकल्या असत्या. पण संघ व्यवस्थापन मात्र हा विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हता.
करुण नायर : त्रिशतकवीर फलंदाज, म्हणून त्याची ओळख. पण ही ओळख फक्त तेवढ्यापुरतीच मर्यादीत राहिली. कारण त्रिशतक झळकावल्यावरही त्यानंतरच्या सामन्यात त्याला संधीच देण्यात आली नव्हती. या दौऱ्यात आतापर्यंत तरी तो पर्यटक आहे. सलामीवीर अपयशी ठरत असताना करुणला सलामीसाठी संधी द्यायला हवी होती. संघातील स्थान वाचवण्यासाठी करुण सलामीला येऊन खेळला असता. जर हा प्रयोग यशस्वी ठरला असता तर मालिकेचा निकाल वेगळा लागू शकला असता.
भारतीय संघ व्यवस्थापन अजूनही आपल्या गुर्मीत असेल, तर बोलणेच खुंटणार. पण जर त्यांना काही प्रयोग करायचे असतील, तर अजूनही एक कसोटी सामना बाकी आहे. लाज राखायची एक संधी त्यांच्याकडे नक्कीच आहे.