ICC Women's T20 World Cup, Semi-Final : भारत आणि इंग्लंड यांच्यातला उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे रद्द करण्याची नामुष्की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर ( आयसीसी) आली आहे. सिडनीत पावसाचा जोर कायम असल्यामुळे सामना रद्द करावा लागला. त्यामुळे अ गटातील अव्वल संघ म्हणून टीम इंडियाचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित झाला आहे. पण, भविष्यात अशा लढतींसाठी राखीव दिवस असायला हवा, असं मत भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं व्यक्त केलं. आयसीसीच्या स्पर्धा नियमानुसार पाऊसाच्या व्यत्ययानंतर किमान २० षटकांचा सामना झाला पाहिजे. त्यात दोन्ही संघांना प्रत्येकी १० षटके मिळावीत. पण, तसेही झाले नाही. त्यामुळे टीम इंडियाचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित झाला. भारतानं अ गटात 8 गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते आणि त्याच जोरावर त्यांचा अंतिम फेरीतील प्रवेश पक्का झाला. इंग्लंडच्या खात्यात 6 गुण होते.
हरमनप्रीत कौर म्हणाली,''सामना न होणे हे दुर्दैवी आहे, पण त्यासाठी काही नियम आहेत आणि त्याचं पालन व्हायला पाहिजे. पण, भविष्यात उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी राखीव दिवस असणे, ही चांगली संकल्पना आहे. उपांत्य फेरीत असा पेचप्रसंग निर्माण होईल याची कल्पना पहिल्या दिवसापासून होती. त्यामुळे गटातील सर्व सामने जिंकण्याचा आमचा निर्धार होता. त्यामुळे सर्व सामने जिंकल्याचे श्रेय खेळाडूंना द्यायला हवे. अंतिम फेरीत प्रवेश निश्चित झाल्यानं संघातील सकारात्मता आणखी वाढली आहे.'' ''पहिली ट्वेंटी-20 फायनल हे आमच्यासाठी खूप मोठं यश आहे. एक संघ म्हणून अंतिम सामन्यात आम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. तसे करण्यात आम्ही यशस्वी झालो, तर निकालही आमच्या बाजूने लागेल. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांची आतापर्यंतची कामगिरी चांगली झाली आहे,'' असेही हरमनप्रीत म्हणाली. इंग्लंडची कर्णधार हिदर नाईटने नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली,''हे खूप निराशाजनक आहे. अशा प्रकारे आम्हाला वर्ल्ड कप स्पर्धेचा निरोप घ्यायचा नव्हता. राखीव दिवस नाही, खेळण्याची संधी मिळाली नाही आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तो पराभव आम्हाला महागात पडला. उपांत्य फेरीत प्रवेश करणे, हे आमचे पहिले लक्ष्य होते आणि ते आम्ही साध्य केले. माझ्या सर्व सहकाऱ्यांनी शंभर टक्के योगदान दिले, म्हणून इथवर मजल मारू शकलो.''