लंडन: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनंइंग्लंडविरुद्ध केलेल्या खेळीवर सध्या सोशल मीडियावर टीका होत आहे. फिनिशर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीसला कालच्या सामन्यात अखेरच्या षटकांमध्ये मोठे फटके मारता आले नाहीत. धोनीसह केदार जाधवनंदेखील एकेरी धावांवर भर दिला. या सामन्यात भारताला 31 धावांनी पराभव पत्करावा लागला. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या पाच षटकांमध्ये 71 धावांची आवश्यकता होती. मात्र धोनी आणि केदारनं मोठे फटके खेळण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. त्यामुळे भारताला 39 धावाच करता आल्या. धोनी आणि केदारच्या या पवित्र्यावर सोशल मीडियावरुन अनेकांनी टीका केली आहे. याशिवाय क्रिकेट तज्ज्ञांनीदेखील नाराजी व्यक्त केली. मात्र भारतीय क्रिकेट संघानं धोनी आणि केदारचा बचाव केला आहे. धोनी, केदारच्या फलंदाजीसाठी शतकवीर रोहित शर्मानं खेळपट्टीला जबाबदार धरलं. 'माही आणि केदारनं चौकार, षटकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र खेळपट्टी संथ झाल्यानं त्यांना अपेक्षित यश आलं नाही,' असं रोहितनं म्हटलं. अंतिम षटकांमध्ये भारतीय फलंदाजांना वेसण घालणाऱ्या इंग्लिश गोलंदाजांचं रोहितनं कौतुक केलं. प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी परिस्थितीचा चांगला वापर केल्याचं रोहित म्हणाला.
भारतीय कर्णधार विराट कोहलीनंदेखील धोनीचं समर्थन केलं. 'एमएस मोठे फटके खेळण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. आता आम्हाला पुढच्या सामन्यावर लक्ष केंद्रीत करुन त्यासाठी रणनिती आखावी लागेल,' असं विराटनं म्हटलं. धोनी आणि केदारला शेवटच्या 31 चेंडूंमध्ये केवळ 39 धावांची भर घालता आली. यातील 20 धावा एकेरी होत्या.