बर्मिंगहॅम, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : रिषभ पंतचे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न अखेर आज साकार होणार. विजय शंकरच्या जागी अंतिम अकरा जणांमध्ये पंतने स्थान पटकावण्यात यश मिळवले. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यान नाणेफेकीचा कौल भारताच्या विरोधात लागला आणि त्यांना क्षेत्ररक्षण करावे लागणार आहे. या संघात पंत वगळता भारतीय संघात कोणताही बदल नाही, तर इंग्लंडने जेसन रॉय व लायम प्लंकेट यांना संधी दिली आहे. दिनेश कार्तिकसारखा अनुभवी खेळाडू उपलब्ध असतानाही पंतची निवड का, याचे उत्तर कर्णधार विराट कोहलीनं दिले.
नाणेफेक जिंकून भारतीय संघानेही प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घ्यायचे ठरवले होते, असे कोहली म्हणाला. ''मलाही नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला आवडले असते. पण, धावांचा पाठलाग करायला नेहमी आवडते. पहिल्या सामन्यानंतर आम्ही धावांचा पाठलाग केलेला नाही आणि स्पर्धेच्या मुख्य टप्प्यात प्रवेश करण्याआधी धावांचा पाठलाग करण्याचे आव्हान मिळाले, हे महत्त्वाचे आहे,'' असे कोहलीनं सांगितले.
रिषभच्या निवडीमागे काय कारण, यावर कोहलीने सांगितले,''विजय शंकरची टाच दुखत आहे. त्यामुळे त्याच्या जागी रिषभ पंतला संधी देत आहोत. तो फलंदाजीत काय करिष्मा दाखवू शकतो, हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे. त्याच्या येण्यानं संघातील बिनधास्तपणा वाढेल. एकदा सूर सापडल्यास, त्याला थांबवणं भल्याभल्यांना अवघड जाईल. येथे सीमारेषाही जवळ आहेत.''
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात संपूर्ण पाकिस्तान टीम इंडियाच्या बाजूनं, शोएब अख्तरचा दावावर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीची चुरस अधिक रंजक होत चालली आहे. जर तरच्या समीकरणावर संघांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे आजच्या भारत-इंग्लंड सामन्यावर पाकिस्तानचा पुढील प्रवास अवलंबून आहे. पाकिस्तान संघाने अफगाणिस्तानवर थरारक विजय मिळवून उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे. पण, त्यांच्या मार्गात यजमान इंग्लंडचा अडथळा आहे आणि आज भारताने विजय मिळवल्यास पाकिस्तानचा हा अडथळा दूर होऊ शकतो. त्यामुळेच आजच्या सामन्यात पाकिस्तानी चाहते भारताच्या विजयाची प्रतीक्षा करत आहेत.
पाकिस्तानने 9 गुणांची कमाई करत चौथे स्थान पटकावले आहे. इंग्लंडचे आतापर्यंत आठ गुण आहेत, त्यामुळे त्यांची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यावर साऱ्यांनाच नजरा असतील. या सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघ उपांत्य फेरीतील स्थान पक्के करेल. शिवाय इंग्लंडचे आव्हान अधिक खडतर बनणार आहे. त्यांना अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवावा लागेल, पण त्याचवेळी पाकिस्तान पराभूत होण्यासाठी प्रार्थना करावी लागेल. पाकिस्तानचा अखेरचा सामना बांगलादेशविरुद्ध आहे.