Join us  

India vs England, Latest News : ठरलं, 'हा' खेळाडू टीम इंडियाकडून आज वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण करणार

India vs England, ICC World Cup : भारतीय संघ विजयी मालिका कायम राखत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्याच्या निर्धारानं आज मैदानावर उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 2:26 PM

Open in App

बर्मिंगहॅम, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघ विजयी मालिका कायम राखत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्याच्या निर्धारानं आज मैदानावर उतरणार आहे. त्यांच्यासमोर यजमान इंग्लंड कडवे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे. इंग्लंडला आपले आव्हान कायम राखण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकणे आवश्यक असल्याने ते आज भारतीय संघासमोर खडतर आव्हान उभे करू शकतील. पण, भारतीय संघ अजूनही चौथ्या क्रमांकाचा तिढा सोडवू शकलेला नाही. विजय शंकरला संधी मिळाली, पण त्यानंही स्थान पक्क होईल अशी कामगिरी केलेली नाही. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याला बाकावर बसवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विजय शंकरचा विश्रांती देण्याचा निर्णय झाल्यास कर्णधार विराट कोहलीसमोर रिषभ पंतचा पर्याय उपलब्ध आहे. बर्मिंगहॅम येथे 2013 ते 2017 या कालावधीत भारतीय संघाने पाच वन डे सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारताचे पारडे जड मानले जात असले तरी मधल्या फळीचे अपयश ही संघासाठी डोकेदुखी ठरली आहे. रिषभ पंतनेही नेट्समध्ये कसून सराव केला. त्यामुळे रिषभ पंत आज वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पणाचा सामना खेळण्याची शक्यता आहे. विराट कोहलीनं रिषभ पंत आज खेळणार असल्याचे जाहीर केले.

गोलंदाजीत बदल होण्याची शक्यता कमीच आहे. भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीत मिळालेल्या संधीचं सोनं करताना मोहम्मद शमीनं आपले स्थान मजबूत केले आहे. त्याचा फॉर्म पाहता त्याला संघाबाहेर बसवण्याचा निर्णय कोहली घेणार ऩाही. अशाच भुवनेश्वर कुमारला विश्रांती देण्याचाच पर्याय निवडला जाईल. युजवेंद्र चहल व कुलदीप यादव हे संघात कायम राहतील. 

शिखर धवनच्या दुखापतीनंतर रिषभला बोलावण्यात आले, परंतु त्याला संधी मिळाली नव्हती. पण, आज तो अखेरीस वर्ल्ड कपमधील पदार्पणाचा सामना खेळेल. भारतीय संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी आजच्या सामन्यात विजय खेळणार नसल्याचे सांगितल्याचा दावा संजय मांजरेकर यांनी केला. त्यामुळे रिषभ पंतचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय युजवेंद्र चहलच्या जागी रवींद्र जडेजाला खेळवण्यात येईल अशीही चर्चा आहे.

 

संभाव्य संघभारत - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, विजय शंकर/रिषभ पंत, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह

इंग्लंड - जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, इयॉन मॉर्गन, बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, टॉम कुराण/जोफ्रा आर्चर, आदील रशीद, ख्रिस वोक्स, मार्क वूड. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतइंग्लंड