लीड्स : भारतीय संघाची फलंदाजी हे बलस्थान आहे. पण तरीही भारताच्या फलंदाजांना इंग्लंडमधल्या एकदिवसीय मालिकेत फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. भारताच्या फलंदाजांना एक षटकार ठोकण्यासाठी तब्बल 637 चेंडूंची वाट पाहावी लागली, यावरून सध्या भारताची फलंदाजी कशी होत आहे, हे तुमच्या लक्षात येईलंच. पण हा षटकारांचा दुष्काळ संपवणारा कुणी फलंदाज नाही, हे ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसेल.
भारतीय संघात रोहित, धवन, कोहली, धोनी, रैना, पंड्या हे सरस फलंदाज आहेत. पण यापैकी एकाही खेळाडूला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात षटकार लगावता आला नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहितने षटकार लगावले होते. पण त्यानंतर दोन्ही सामन्यांत भारतावर षटकार न लगावण्याची नामुष्की ओढवली.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात एकाही फलंदाजाला षटकार लगावता आला नाही. तब्बल 637 चेंडू भारत षटकाराविना खेळत होता. पण अखेर भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने हा षटकारांचा दुष्काळ संपवला. शार्दुलने तिसऱ्या लढतीत 12 चेंडूंत नाबाद 22 धावांची खेळी साकारली होती.