लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यामधील कसोटी मालिकेला 1 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. हा सामना ज्या बर्मिंगहममध्ये रंगणार आहे, तिथे भारताला एकही विजय मिळवता आलेला नाही. त्याचबरोबर आतापर्यंत भारतीय फलंदाज या मैदानाता नापास ठरले आहेत.
या मैदानात आतापर्यंत भारताने सहा कसोटी सामने खेळले आहेत. या सहापैकी एकही सामना भारताला जिंकता आलेला नाही. इंग्लंडने मात्र या सहापैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर एक सामना अनिर्णित राहीला आहे. त्यामुळे भारतीय संघ यावेळी कसोटी सामना जिंकला तर तो त्यांचा पहिला विजय ठरेल.
बर्मिंगहमच्या मैदानात एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. कारण या मैदानात भारतीय फलंदाजांकडून जास्त धावा पाहायला मिळालेल्या नाहीत. भारताकडून या मैदानात सर्वाधिक धावा आहेत त्या माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या. आतापर्यंत तीन कसोटी सामन्यांमध्ये गावस्कर यांनी 216 धावा केल्या होत्या. आतापर्यंत या मैदानात भारताच्या गावस्कर यांनाच दोनशेपेक्षा जास्त धावा करता आल्या आहेत.