नॉटिंगहॅम : जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) अंतिम लढतीत न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर जवळपास महिनाभर विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ बुधवारी मैदानात उतरेल. डब्ल्यूटीसीच्या पहिल्या सत्रात उपविजेते राहिल्यानंतर दुसऱ्या सत्राची आव्हानात्मक सुरुवात करताना टीम इंडिया बुधवारपासून यजमान इंग्लंडविरुद्ध दोन हात करेल. यावेळी संघाचा अचूक ताळमेळ साधण्याचे मुख्य आव्हान कर्णधार विराट कोहलीपुढे असेल.
डब्ल्यूटीसी अंतिम लढतीसाठी कोहलीने आपल्या अंतिम संघाची घोषणा सामन्याच्या काही दिवसआधीच केली होती. यावेळी परिस्थितीनुसार निर्णय न घेतल्याने त्याच्यावर मोठी टीकाही झाली होती. त्यामुळेच बुधवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी संतुलित संघ उतरवण्यासाठी त्याला खूप विचार करावा लागेल. सलामीसाठी भारताकडे रोहित शर्माच्या रूपाने सक्षम पर्याय आहे. मात्र, त्याने इंग्लंडसारख्या दुसरीकडे लोकेश राहुलवर भारतीय संघ व्यवस्थापन विश्वास ठेवू शकते. मात्र, गेल्या काही सामन्यांत तो डावाची सुरुवात करताना अनेकदा अडखळला आहे. सराव सामन्यात त्याने शतकी खेळी करत आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. मयांक अग्रवाल सराव सत्रादरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागी अनुभवी राहुलला पहिली पसंती मिळेल.
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ॠषभ पंत, आर. आश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल, रिद्धिमान साहा, अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव.
इंग्लंड : जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेयरस्टो, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, जैक क्रॉउली, सैम कुरेन, हसीब हमीद, डेन लॉरेंस, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, डॉम सिबले आणि मार्क वूड.
सामन्याची वेळ : दुपारी ३:३० वाजेपासून (भारतीय वेळेनुसार)
मायकेल वाॅनने भारताला डिवचलेट्रेंटब्रिजच्या हिरव्यागार खेळपट्टीवरून इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने भारताला डिवचले आहे. वॉन हा भारतीय खेळाडूंवर नेहमी ताशेरे ओढत असतो. त्याने आज हिरव्यागार खेळपट्टीवर हिरवी झाडे लावलेला फोटो शेअर केला. त्यावर लिहिले, ‘मजेदार मालिका असेल. प्रतीक्षा कधी थांबणार? भारताला अशा खेळपट्ट्यांवर फार अडचण जाणवेल, असा इशारा वॉनने दिला आहे.