इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघ चेन्नईत दाखल झाले असून सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. सर्व खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून ६ दिवसांच्या क्वारंटाईननंतर खेळाडू सरावाला सुरुवात करतील. टीम इंडियाच्या खेळाडूंचा तीनपैकी पहिल्या कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर BCCIनं त्यांच्यासाठी सप्राईज गिफ्ट दिलं.
''नियमानुसार क्वारंटाईन कालावधीतही खेळाडूंची पहिली RT-PCR चाचणी करण्यात आली आहे आणि अजून दोन चाचणी होणे शिल्लक आहेत. पहिल्या चाचणीत सर्व खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आता सर्व खेळाडूंना त्यांच्यात्यांच्या रुममध्ये क्वारंटाईन केलं आहे,''अशी माहिती BCCIच्या अधिकाऱ्यांनी दिली. निक वेब आणि सोहम देसाई या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू व्हिडीओ कॉल द्वारे व्यायाम करत आहेत.
बीसीसीआयनं या दौऱ्यावर खेळाडूंच्या कुटुंबीयांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे. बीसीसीआयच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे, कारण भारतीय खेळाडू मागील ६-७ महिने कुटुंबीयांपासून दूर आहेत. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, सलामीवीर रोहित शर्मा, यष्टिरक्षक वृद्धीमान सहा, अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हे सर्व आपापल्या कुटुंबीयांसोबत चेन्नईत दाखल झाले आहेत आणि त्यांनी सोशल मीडियावर फोटोही पोस्ट केले आहेत.
''खेळाडू बऱ्याच महिन्यानंतर मायदेशात परतले आहेत. क्वारंटाईन कालावधीत एकट्यानं राहणं आव्हानात्मक असते. मायदेशात होणाऱ्या मालिकेत कुटुंबातील सदस्य सोबत असतील तर खेळाडूंही आनंदी राहतील,''असेही सूत्रांनी सांगतिले.
Video : अजिंक्य रहाणेचा लेकीसोबत Cute Dance! या मालिकेत BCCIनं खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांसोबत प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक खेळाडू आपापल्या पत्नी व मुलांसोबत या दौऱ्यावर असणार आहेत. बुधवारी अजिंक्यची पत्नी राधिका हिनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. क्वारंटाईनच्या पहिल्या दिवशी अजिंक्य मुलगी आर्यासोबत डान्स करताना दिसत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातला पहिला कसोटी सामना ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. दुसरा कसोटी सामनाही येथेच होईल. त्यानंतर तिसरा व चौथा कसोटी सामना २४ फेब्रुवारी व ४ मार्च या तारखेपासून अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर खेळवला जाईल. तिसरा कसोटी सामना हा दिवस-रात्र सामना असेल.