अहमदाबाद : भारतीय संघाने बुधवारपासून इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दिवस-रात्र कसोटीपूर्वी नव्या मोटेरा स्टेडियममध्ये स्विंग होणाऱ्या गुलाबी चेंडूवर सराव केला. कर्णधार विराट कोहलीने या कडव्या सराव सत्राचे नेतृत्व केले. इंग्लंडने चेन्नईमध्ये पहिला कसोटी सामना २२७ धावांनी जिंकला होता आणि भारताने शानदार पुनरागमन करताना याच स्टेडियममध्ये दुसऱ्या सामन्यात ३१७ धावांनी विजय मिळवीत चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
स्थानिक संघ आणखी एक विजय मिळवीत मालिकेत आघाडी घेण्यास उत्सुक आहे. यावर लक्ष केंद्रित करताना भारतीय खेळाडूंनी नव्या सरदार पटेल स्टेडियममध्ये नेट्समध्ये सरावाला सुरुवात करण्यापूर्वी स्ट्रेचिंग एक्सरसाइज, फिल्डिंग ड्रील केली. जगातील सर्वांत मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये १ लाख १० हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे.
कर्णधार कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा व यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांनी फलंदाजीचा सराव केला, तर जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज उन्हात धावत सराव करताना दिसले. वेगवान गोलंदाज बुमराह चेपॉकमध्ये दुसऱ्या सामन्यात खेळला नव्हता आणि तो पुनरागमनासाठी सज्ज आहे. इशांत शर्मा गोलंदाजी करताना दिसला. तो १०० वी कसोटी खेळण्याच्या उंबरठ्यावर आहे.
या मालिकेत पहिल्या दोन कसोटी सामन्यात फिरकीपटूंनी अधिक बळी घेतले असले तरी भारतीय वेगवान गोलंदाजांनी कोलकातामध्ये बांगलादेशविरुद्ध मायदेशात खेळल्या गेलेल्या यापूर्वीच्या दिवस-रात्र गुलाबी चेंडूच्या सामन्यात सर्व २० बळी घेत विजय मिळवून दिला होता. सलामीवीर फलंदाज शुभमन गिल व मयांक अग्रवाल यांनीही नेटमध्ये सराव केला. त्यामुळे पंजाबचा फलंदाज आगामी लढतीमध्ये पुन्हा एकदा रोहितसोबत सलामीला येण्यासाठी तयारी करीत असल्याचे दिसले.
सूर्यास्ताच्यावेळी फलंदाजी करताना सावधगिरी बाळगावी लागेल - रोहित
कारकिर्दीतील केवळ दुसरा दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याची तयारी करीत असलेला भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने सूर्यास्ताच्या वेळी फलंदाजी करताना अतिरिक्त सावधगिरी बाळगावी लागेल, असे म्हटले आहे. चेन्नईमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यात १६१ धावांची खेळी करणारा रोहित नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध भारतात झालेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटीत खेळला होता. पण त्यावेळी त्याला सूर्यास्ताच्या वेळी फलंदाजी करावी लागली नव्हती.
रोहित म्हणाला,‘मी ज्यावेळी आपल्या सहकाऱ्यांकडून ऐकतो त्यावेळी ते डोक्यात असते. मी बांगलादेशविरुद्ध केवळ एकमेव दिवस-रात्र कसोटी सामना खेळला आहे. पण त्यावेळी सूर्यास्ताच्या वेळी फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. हे निश्चितच आव्हानात्मक आहे. वातावरण व प्रकाश एकदम बदलतो. त्यावेळी तुम्हाला अतिरिक्त सावधगिरी व एकाग्रता बाळगावी लागते. सर्व फलंदाजांना अशा प्रकारच्या आव्हानाची कल्पना आहे.
गुलाबी चेंडू स्विंग होईल याचा वेध घेणे कठीण - पुजारा
भारत-इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना येथील मोटेरा स्टेडियमवर २४ फेब्रुवारीपासून दिवस- रात्र खेळला जाणार आहे. या सामन्यात एसजी कंपनीच्या गुलाबी चेंडूंचा वापर होईल. एरवी गुलाबी चेंडू रात्रीच्या प्रकाशात साधारणपणे हवेत स्विंग होतो. तथापि येथील खेळपट्टीवर प्रथमच सामना होणार असून एसजी चेंडू हवेत स्विंग होईल का याचा अंदाज बांधणे कठीण असल्याचे मत भारताचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा याने शनिवारी व्यक्त केले. भारताने दिवस-रात्रीचे केवळ दोन कसोटी सामने खेळले आहेत.
गुलाबी चेंडूने खेळण्याचा भारतीय खेळाडूंना फार अनुभव नाही. पहिल्या सरावानंतर व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत पुजारा म्हणाला, ‘आगामी कसोटीत नव्या खेळपट्टीवर गुलाबी चेंडू हवेत किती स्विंग होईल, हे सांगणे कठीण आहे. सुरुवातीला चेंडू वळण घेऊ शकतो. सामना जसजसा पुढे सरकत जाईल तेव्हा स्विंग कमी होऊ शकतो. तथापि गुलाबी चेंडू कसा वळण घेईल, याचा वेध घेणे फार कठीण आहे.