लंडन - भारतीय क्रिकेट संघाने लॉर्ड्सवर खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाचा १५१ धावांनी धुव्वा उडवला होता. या सामन्यात भारताने ज्याप्रकारे विजय मिळवला तो पाहून अनेकांना या मालिकेत इंग्लंडच्या संघाचे पुनगारमन होणे अवघड वाटत आहे. (India VS England Test Series Update)भारतीय संघाच्या तुलनेत इंग्लंडचा संघ कमालीचा दुबळा दिसत आहे. आता भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनीही इंग्लंडच्या संघावर जोरदार टीका केली आहे. इंग्लंडचा संघ हा तर दोन खेळाडूंचा संघ आहे, अशा शब्दात गावस्करांनी इंग्लिश संघाची खिल्ली उडवली. तसेच पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ ४-० अशा फरकाने विजय मिळवेल, असे भाकितही गावस्करांनी केले. ( "It's a team of two players", Sunil Gavaskar scoffed of England, Says India will win the Test series 4-0)
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी पावसाने संपूर्ण दिवसाचा खेळ वाया गेल्याने भारताची विजय मिळवण्याची संधी हुकली होती. मात्र दुसऱ्या कसोटीत पाऊसही इंग्लंडच्या मदतीला आला नाही अखेरीस भारताने हा सामना १५१ धावांनी जिंकला होता.
दरम्यान, अखेरच्या दिवशी इंग्लंडच्या संघाला केवळ दोन सत्रेही खेळून काढता न आल्याने गावस्कर यांनी इंग्लिंश फलंदाजांवर टीका केली आहे. सध्याचा इंग्लंडचा संघ हा केवळ दोन खेळाडूंचा संघ आहे. हे दोन खेळाडू म्हणजे जो रूट आणि जेम्स अँडरसन. या संघात जे खेळाडू आहेत त्यांचा मी मान राखतो. मात्र हा संघ परिपूर्ण कसोटी संघ वाटत नाही, असे गावस्कर म्हणाले.
यावेळी सुनील गावस्कर यांनी इंग्लिश फलंदाजांच्या तंत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. इंग्लिश फलंदाजांचे तंत्र खूप वाईट आहे. त्यांच्या सलामीवीरांचे तंत्र अगदीच ओबडधोबड आहे. तर तिसऱ्या क्रमांकावरील हसीम हमीद हा नर्व्हसनेसची शिकार झालेला होता. त्यामुळे जो रूटकडे आशेने पाहावे लागले. जॉनी बेअरस्टो खेळला तर चांगला खेळतो नाही तर काहीच खेळत नाही. जोस बटलर पांढऱ्या चेंडूवर चांगला खेळतो. मात्र तो कसोटीसाठी योग्य फलंदाज आहे, याबाबत माझ्या मनात शंका आहे.
सुनिल गावस्कर यांनी यावेळी इंग्लंडच्या गोलंदाजीवरही टीका केली. ते म्हणाले इंग्लंडचे गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमीमधील भागीदारी तोडू शकले नाहीत. या दोघांमधील भागीदारीने भारताच्या विजयाची शक्यता वाढवली. इंग्लंडकडे केवळ जेम्स अँडरसन आहे. ओली रॉबिन्सनचे ट्रेंट ब्रिजमध्ये पाच बळी घेतले. मात्र वास्तवात हा केवळ अडीच लोकांचा संघ आहे.
भारतीय संघ ही मालिका ४-० अशा फरकाने जिंकेल असा मला विश्वास आहे. मी मालिकेच्या सुरुवातीलाच भारताने ही मालिका ४-० किंवा ३-१ अशा फरकाने जिंकली पाहिजे, असे म्हटले होते. आता मला हा निकाल शक्य आहे, असे वाटते. मात्र पावसाने खेळ खराब करता कामा नये, असे गावस्कर म्हणाले.