India vs England : लॉर्ड्स कसोटीत टीम इंडियानं ऐतिहासिक विजय मिळवून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडवर १-० अशी आघाडी घेतली आहे. हा सामना भारतीय खेळाडूंच्या कामगिरीनं गाजला तेवढाच दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये झालेल्या शाब्दीक बाचाबाचीही चर्चा रंगली. मैदानावर उडालेल्या या खटक्यांचे पडसाद सामन्यानंतरही पाहायला मिळाले. इंग्लिश वृत्तपत्रांनी भारतीय खेळाडूंवर आरोप करताना दोन राखीव खेळाडूंनी इंग्लंडचा गोलंदाज ऑली रॉबिन्सन याची वाट अडवल्याचा दावा केला. त्यात आता टीम इंडियाचे फिल्डींग कोच आर श्रीधर यांनी इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसन याची अखिलाडूवृत्ती जगासमोर आणली आहे.
वर्ल्ड कप सुपर लीगमध्ये पाकिस्तान कर्णधार बाबर आजमलाच संघाबाहेर ठेवणार!
भारत-इंग्लंड यांच्यातला दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर खेळवला गेला. त्यात सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं फलंदाजीला आलेल्या अँडरसनवर बाऊन्सरचा मारा केला. बाद झाल्यानंतर अँडरसननं प्रत्युत्तरात बुमराहसाठी अपशब्द वापरले. पण, तो डाव संपल्यानंतर बुमराह इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूची माफी मागण्यासाठी गेला होता, मात्र त्यानं भारतीय गोलंदाजाच्या माफीचा स्वीकार केला नाही, असे आर श्रीधर यांनी सांगितले.
आर अश्विन याच्याशी बोलताना श्रीधर म्हणाले,''तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा डाव संपल्यानंतर खेळाडू ड्रेसिंग रूमच्या दिशेनं जात होते. बुमराह त्यावेळी अँडरसनकडे गेला अन् त्यानं माफी मागण्याचा प्रयत्न केला. जे काही केलं ते जाणीवपूर्वक केलेले नाही, असे तो त्याला सांगत होता. पण, अँडरसननं त्याला धुडकावून लावलं. त्याचं हे वागणं टीम इंडियातील अन्य सदस्यांना आवडले नाही आणि त्यामुळेच सर्व भडकले. त्याची प्रचिती पाचव्या दिवसाच्या खेळात आली.''
जेम्स अँडरसनला जखमी करण्याचा कोणताच मानस नव्हता. त्याला बाऊन्सर मारा करून बाद करण्याचा बुमराहचा प्रयत्न होता, असे सांगत श्रीधर म्हणाले,बुमराह हा स्पर्धात्मक खेळाडू आहे, परंतु त्यानं कधीच कोणाला जाणीवपूर्वण जखमी करण्याचा प्रयत्न केला नाही. बुमराहनं अँडरसनला ८-१० चेंडू टाकले. त्यात यॉर्कस, बाऊन्सरचा समावेश होता, परंतु त्याला बाद करू शकला नाही.''