लंडन : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली चांगली फलंदाजी करत होता. त्यानं अर्धशतक झळकावलं आणि आता कोहली शतकाची वेस ओलांडणार, या चर्चांना उत आला. पण कोहलीला शतक झळकावता आलं नाही. कारण इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशिदने त्याला क्लीन बोल्ड केलं. कोहली ज्या चेंडूवर बोल्ड झाला तो आता ' मॅजिक बॉल ' असल्याचं काही जणांना वाटत आहे.
तिसाव्या षटकातील रशिदच्या पहिल्या चेंडूवर कोहली बोल्ड झाला. हा चेंडू लेग स्पम्पच्या लाईनवर पडला होता. तिथून वळून कोहलीच्या नजरेसमोरून तो ऑफ स्टम्पवर येऊन आदळला. हा चेंडू ज्यापद्धतीने वळला ते खरंच नेत्रसुखद होतं. त्याचबरोबर कोहलीच्या फलंदाजीतील कच्चा दुवाही यावेळी समोर आला. पण या चेंडूला आता ' मॅजिक बॉल 'चं वलय मिळत आहे.
' मॅजिक बॉल ' म्हणजे नेमकं काय ?ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात 1993 साली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी सामना सुरु होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा माजी महान फिरकीपटू शेन वॉर्न गोलंदाजी करत होता आणि इंग्लंडचा माईक गेटिंग फलंदाजी करत होता. त्यावेळी वॉर्नचा एक चेंडू लेग स्टम्पच्या बाहेर पडला. हा चेंडू स्टम्पला लागणार नाही, असं गेटिंगसहीत साऱ्यांना वाटतं होतं. पण या चेंडूने उजव्या स्टम्पला स्पर्श केला आणि सारेच चकित झाले. त्यानंतर या चेंडूला ' मॅजिक बॉल ' असं संबोधलं गेलं