अहमदाबाद : इंग़्लंडविरुद्ध तिसऱ्या दिवस-रात्र कसोटीत अतिरिक्त फलंदाज संघात असावा, असा विचार पुढे आल्यामुळे फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला खेळविले नाही, असे कर्णधार विराट कोहली याने बुधवारी नाणेफेकीच्या वेळी स्पष्ट केले.
या सामन्यात भारताने संघात दोन बदल केले. वेगवान मोहम्मद सिराजऐवजी जसप्रीत बुमराहला स्थान दिले; तर कुलदीपच्या जागी वाॅशिंग्टन सुंदरचा समावेश केला. पिंकबॉल कसोटीत एक अतिरिक्त फलंदाज हवा, हा विचार व्यवस्थापनाच्या बैठकीदरम्यान पुढे आल्यामुळे कुलदीपला बाहेर बसावे लागले, असे कोहलीने सांगितले.
‘आम्ही एक फिरकी गोलंदाज आणि एक फलंदाज संघात ठेवण्याच्या विचारात होतो. वॉशिंग्टन सुंदर हा योग्य पर्याय ठरला. आम्हांला अतिरिक्त फलंदाज हवा होता. दुसऱ्या कसोटीत कुलदीप विशेष कामगिरी करू शकला नाही,’ असे कर्णधाराचे मत होते.