नॉटिंघम - येथे काल झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा आठ विकेटने दारुण पराभव केला. कुलदीप यादव आणि रोहित शर्मा या सामन्याचे हिरो ठरले. कुलदीपच्या भेदक फिरकीपुढे पुन्हा एकदा इंग्लंडच्या फलंदाजीची दाणदाण उडाली. त्याने जेसन रॉय, जॉनी बेयरस्टॉ व जो रुट या आघाडीच्या फलंदाजांना पाठोपाठ बाद केल्याने इंग्लंडचा डाव 4 बाद 105 असा घसरला. बेन स्टोक्स, जोस बटलर यांनी 93 धावांची भागीदारी करत इंग्लंडला सावरले. मात्र, कुलदीपने बटलरला बाद केले. यानंतर लगेच स्टोक्स व डेव्हिड विली कुलदीपचे बळी ठरले. कुलदीपने पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले. इंग्लंडमध्ये 6 बळी घेणारा तो पहिला फिरकीपटू तसेच एकदिवसीय सामन्यात 6 बळी घेणारा तो आठवा भारतीयही ठरला.
साहेबांविरोधात टिच्चून मारा करत कुलदीपने 10 षटकात 25 धावा देताना 6 बळी टिपले. जागतिक क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच डावखुरा गोलंदाज ठरला आहे. या अगोदर हा विक्रम भारताच्याच मुरली कार्तिकच्या नावावर होता. त्याने 10 षटकात 27 धावा देत सहा बळी घेतले होते. कुलदीप यादवच्या फिरकीसमोर इंग्लंडची फलंदाजी पूर्णपणे कोलमडून पडली.