बर्मिंगहॅम, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी इंग्लंडला सकारात्मक सुरुवात करून दिली. दुखापतीतून सावरणाऱ्या रॉयनं भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला, शिवाय त्याला नशीबाचीही साथ मिळाली. उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्यानं टाकलेल्या 11 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रॉयला जीवदान मिळालं. रॉय व बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. रॉय बाद असल्याची अपील भारतीय खेळाडूंनी केली, परंतु त्यावर DRS न मागितल्याचा फटका भारताला बसला.
पांड्यानं टाकलेला चेंडू व्हाईडच्या दिशेनं गेला, परंतु त्याला छेडछाड करण्याचा मोह रॉयला आवरता आला नाही. चेंडू त्याच्या ग्लोव्हजला घासून यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या हातात विसावला. धोनीनं त्वरित अपील केले, परंतु पंचांनी व्हाईडचा सिग्नल दिला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली व पांड्या धोनीकडे आले. पण, धोनीनं DRS न घेण्यास सांगितले. त्यानंतर रिप्लेत पाहिले असता रॉय बाद असल्याचे स्पष्ट दिसत होते, त्यामुळे DRS चा निर्णय घेतला असता तर भारताला पहिले यश मिळाले असते, असे चाहत्यांना वाटले.
विराट कोहलीनं पाकिस्तानी चाहत्यांना काढला चिमटा, म्हणाला...बर्मिंगहॅम, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत-इंग्लंड हा सामना यजमान आणि पाकिस्तान यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या सामन्यातील निकाल उपांत्य फेरीची दिशा ठरवणारा आहे. या सामन्यात इंग्लंडने बाजी मारल्यास त्यांचे आव्हान कायम राहणार आहे, पण भारत जिंकल्यास पाकिस्तानचा फायदा होणार आहे. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तानचे चाहते टीम इंडियाला पाठिंबा देताना पाहायला मिळत आहेत. यावरून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं पाकिस्तानी चाहत्यांना चिमटा काढला.
त्यामुळे या सामन्यात पाकिस्तानी चाहते भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत. स्टेडियमबाहेरही पाक चाहते भारतीयांसोबत जल्लोष करताना दिसले. नाणेफेकीनंतर कोहली म्हणाला,''हा पाकिस्तानसाठी महत्त्वाचा सामना आहे. आशा करतो की पाकिस्तानी चाहते आम्हाला पाठिंबा देतील. हा खूप दुर्मिळ प्रसंग असेल.''