बर्मिंगहॅम, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यजमान इंग्लंडचा वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास खडतर झालेला आहे. पाकिस्तानच्या विजयाने त्यांच्या मार्गातील अडचण अधिक वाढली असून त्यांना आता उर्वरित सामन्यांत विजय मिळवावाच लागणार आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड या सामन्यात त्यांची कसोटी लागणार आहे. आज बर्मिंगहॅम येथे इंग्लंडला स्पर्धेतील अपराजित संघ भारताचा सामना करावा लागणार आहे. स्पर्धेतील आव्हान टीकवण्याच्या दृष्टीनं ते या सामन्यात आपला हुकूमी एक्का मैदानावर उतरवण्याच्या तयारीत आहे. शिवाय गोलंदाजीतही एक बदल करण्याची शक्यता आहे.
इंग्लंडचा संघ 7 सामन्यांत चार विजयांसह ( 8 गुण) पाचव्या स्थानवर आहे. त्यांच्यापुढे पाकिस्तान ( 9 गुण) आणि न्यूझीलंड ( 11 गुण) हे दोन संघ आहेत. त्यामुळे इंग्लंडला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना भारताला नमवावे लागणार आहे. सलामीवीरांचे अपयश ही इंग्लंडसाठी डोकेदुखी ठरलेली आहे. जेसन रॉयच्या अनुपस्थितीत जेम्स विन्सला संधी मिळाली, परंतु त्याला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे भारताविरुद्ध त्यांना यावर काहीतरी तोडगा शोधावा लागणार आहे. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने स्पष्ट केले की,'' भारताविरुद्धच्या सामन्यासाठी जेसन रॉय पूर्णपणे तंदुरुस्त झालेला आहे आणि त्याने नेटमध्ये फलंदाजीचा सरावही केला. त्यामुळे रॉयला अंतिम अकरामध्ये खेळवण्यात येईल.''
शिवाय मागील लढतीत त्यांच्या गोलंदाज जोफ्रा आर्चर याच्या हॅमस्ट्रींगचा त्रास झाला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याच्या खेळण्यावर संभ्रम आहे. अशात टॉम कुरण या युवा अष्टपैलू खेळाडूला संधी मिळू शकते.
हेड-टू-हेडया दोन्ही संघांदरम्यान सन १९७४ पासून आतापर्यंत ९९ आंतरराष्टÑीय एकदिवसीय सामने झाले असून, त्यापैकी भारताने ५३ सामने जिंकून वर्चस्व राखले आहे. इंग्लंडने ४१ सामने जिंकले आहेत. याशिवाय दोन सामने टाय झाले असून, तीन सामने कोणत्याही निकालाविना संपले.या दोन्ही संघांदरम्यान शेवटच्या पाच लढतींमधील तीन सामने इंग्लंडने, तर दोन सामने भारताने जिंकले आहेत.या दोन्ही संघांदरम्यान विश्वचषकामध्ये १९७५ पासून आतापर्यंत सात सामने झाले असून, यातील प्रत्येकी तीन सामन्यांमध्ये भारत आणि इंग्लंडने विजय मिळविलेला आहे. एक सामना टाय झाला आहे.विश्वचषकामध्ये या दोन्ही संघांनी परस्परांच्या विरोधात ३३८ धावा अशी सर्वाेच्च धावसंख्या उभारली आहे.भारताची इंग्लंडच्या विरोधात १३२ धावांची नीचांकी खेळी आहे, तर इंग्लंडची नीचांकी धावसंख्या १६८ आहे.