बर्मिंगहॅम, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : स्पर्धेत अपराजित असलेला भारतीय संघ आज यजमान इंग्लंडचा सामना करणार आहे. बर्मिंगहॅम येथील एडबॅस्टन क्रिकेट मैदानावर हा सामना होणार आहे. या मैदानावरील इतिहास पाहता भारतीय संघाचे पारडे जड आहे. पण, स्पर्धेतील आव्हान टीकवण्याच्या दृष्टीनं इंग्लंडसाठी हा सामना महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून चुरशीची टक्कर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इंग्लंडला सलग पराभव पत्करावा लागल्याने उर्वरित दोन सामन्यांत ( भारत व न्यूझीलंड) विजय मिळवणे अनिवार्य झाले आहे. दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विजयी मालिका कायम राखली आहे. त्यांनी सहापैकी पाच सामने जिंकले आहेत, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे उर्वरित तीन सामन्यांत त्यांना केवळ एक विजय उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी पुरेसा आहे.
हवामानाचा अंदाजबर्मिंगहॅम येथे पाऊस पडण्याची शक्यता अजिबात नाही. येथे दिवसभर लख्ख सूर्यप्रकाश असणार आहे आणि तापमान 19 ते 21 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल.
खेळपट्टीचा अंदाजयेथे धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने बाजी मारलेली आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणे योग्य ठरेल. कुलदीप यादव व युजवेंद्र चहल यांचा दबदबा पाहायला मिळेल.
आकडेवारी
- या मैदानावर भारतीय संघ 10 सामने खेळला आहे आणि त्यापैकी सातमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. 2013 पासून भारतीय संघाने येथे सलग पाच सामने जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे. यामध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत ( 2013 व 2017) आठ विकेट आणि 124 धावा राखून मिळवलेल्या विजयाचा समावेश आहे.
- या मैदानावर भारत आणि इंग्लंड चार वेळा समोरासमोर आले आणि भारताने तीन सामने जिंकले आहेत. तेच बांगलादेशविरुद्ध 2017 मध्ये येथे खेळलेल्या अखेरच्या सामन्यात भारताने 9 विकेट्सने विजय मिळवला होता.
- इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेत भारत यजमानांशी तीन वेळा भिडला आणि त्यात दोन विजय मिळवले. 1975, 1983 आणि 1999 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने इंग्लंडचा सामना केला. इंग्लंडने पहिला सामना जिंकला होता.
- 1999च्या वर्ल्ड कप स्पर्धेत उभय संघ एडबॅस्टन येथे एकमेकांविरुद्ध खेळले होते. या सामन्यात राहुल द्रविड ( 53) आणि सौरव गांगुली ( 40) यांच्या खेळीच्या जोरावर भारताने 232 धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 169 धावांत तंबूत परतला. गांगुली ( 3/27), जवागल श्रीनाथ ( 2/25) आणि अनिल कुंबळे ( 2/30) यांनी इंग्लंडचा डाव गुंडाळला.