बर्मिंगहॅम, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत-इंग्लंड हा सामना यजमान आणि पाकिस्तान यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या सामन्यातील निकाल उपांत्य फेरीची दिशा ठरवणारा आहे. या सामन्यात इंग्लंडने बाजी मारल्यास त्यांचे आव्हान कायम राहणार आहे, पण भारत जिंकल्यास पाकिस्तानचा फायदा होणार आहे. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तानचे चाहते टीम इंडियाला पाठिंबा देताना पाहायला मिळत आहेत. यावरून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं पाकिस्तानी चाहत्यांना चिमटा काढला.
पाकिस्तानने 9 गुणांची कमाई करत चौथे स्थान पटकावले आहे. इंग्लंडचे आतापर्यंत आठ गुण आहेत, त्यामुळे त्यांची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यावर साऱ्यांनाच नजरा असतील. या सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघ उपांत्य फेरीतील स्थान पक्के करेल. शिवाय इंग्लंडचे आव्हान अधिक खडतर बनणार आहे. त्यांना अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवावा लागेल, पण त्याचवेळी पाकिस्तान पराभूत होण्यासाठी प्रार्थना करावी लागेल. पाकिस्तानचा अखेरचा सामना बांगलादेशविरुद्ध आहे.
त्यामुळे या सामन्यात पाकिस्तानी चाहते भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत. स्टेडियमबाहेरही पाक चाहते भारतीयांसोबत जल्लोष करताना दिसले. नाणेफेकीनंतर कोहली म्हणाला,''हा पाकिस्तानसाठी महत्त्वाचा सामना आहे. आशा करतो की पाकिस्तानी चाहते आम्हाला पाठिंबा देतील. हा खूप दुर्मिळ प्रसंग असेल.''
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात संपूर्ण पाकिस्तान टीम इंडियाच्या बाजूनं, शोएब अख्तरचा दावा
पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनेही संपूर्ण पाकिस्तान या सामन्यात भारताच्या बाजूने उभा असेल, असा दावा केला आहे. तो म्हणाला,''पाकिस्तानी चाहते भारतीय संघाच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानींनाही मी भारताला पाठिंबा देण्याची विनंती करतो. कारण, भारताने इंग्लंडला पराभूत केल्यास पाकिस्तान उपांत्य फेरीत प्रेवश मिळवू शकेल.''
शोएब अख्तरला शेजारधर्म आठवला; पाक संघासाठी टीम इंडियाकडे विनवणी
भारत-इंग्लंड लढतीपूर्वी शोएब अख्तरने एक व्हिडीओ अपलोड केला. तो म्हणाला,''पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून देण्यासाठी भारतीय संघ मदत करेल. भारतीय संघाने इंग्लंडला नमवल्यास पाकिस्तानचा मार्ग सोपा होईल.''
Web Title: India Vs England, Latest News, ICC World Cup 2019 : I'm sure the fans of the Pakistan team will be supporting us today which is quite a rare thing, say Virat Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.