बर्मिंगहॅम, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : येथील एडबॅस्टन क्रिकेट मैदानावर भारत-इंग्लंड यांच्यात आज सामना होणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान कायम राखण्याच्या दृष्टीनं यजमान इंग्लंडसाठी हा सामना करो वा मरो असाच आहे. त्यामुळे या सामन्यात ते सर्वस्व पणाला लावतील, हे निश्चित आहे. पण, भारतीय संघाची कामगिरी पाहता त्यांचे पारडे जड मानले जात आहे. त्यात एडबॅस्टन मैदानावरील विक्रमही भारताच्या बाजूनं आहेत. त्यामुळे भारतीय चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
या मैदानावर भारतीय संघ 10 सामने खेळला आहे आणि त्यापैकी सातमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. 2013 पासून भारतीय संघाने येथे सलग पाच सामने जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे. यामध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत ( 2013 व 2017) आठ विकेट आणि 124 धावा राखून मिळवलेल्या विजयाचा समावेश आहे.
या मैदानावर भारत आणि इंग्लंड चार वेळा समोरासमोर आले आणि भारताने तीन सामने जिंकले आहेत. तेच बांगलादेशविरुद्ध 2017 मध्ये येथे खेळलेल्या अखेरच्या सामन्यात भारताने 9 विकेट्सने विजय मिळवला होता.
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेत भारत यजमानांशी तीन वेळा भिडला आणि त्यात दोन विजय मिळवले. 1975, 1983 आणि 1999 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने इंग्लंडचा सामना केला. इंग्लंडने पहिला सामना जिंकला होता.
1999च्या वर्ल्ड कप स्पर्धेत उभय संघ एडबॅस्टन येथे एकमेकांविरुद्ध खेळले होते. या सामन्यात राहुल द्रविड ( 53) आणि सौरव गांगुली ( 40) यांच्या खेळीच्या जोरावर भारताने 232 धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 169 धावांत तंबूत परतला. गांगुली ( 3/27), जवागल श्रीनाथ ( 2/25) आणि अनिल कुंबळे ( 2/30) यांनी इंग्लंडचा डाव गुंडाळला.
संभाव्य संघ
भारत - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, विजय शंकर/दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह
इंग्लंड - जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, इयॉन मॉर्गन, बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, टॉम कुराण/जोफ्रा आर्चर, आदील रशीद, ख्रिस वोक्स, मार्क वूड.
Web Title: India vs England, Latest News, ICC World Cup 2019 : Indian cricket team records on edgbaston cricket ground
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.