लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : रविवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या 337 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 5 बाद 306 धावांपर्यंतच मजल मारू शकला. रोहित शर्मा ( 102), विराट कोहली ( 66) , हार्दिक पांड्या ( 45), महेंद्रसिंग धोनी ( 42) आणि रिषभ पंत ( 32) यांची खेळी व्यर्थ ठरली. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी 160 धावांची विक्रमी भागीदारी करून इंग्लंडला धमाकेदार सुरुवात करून दिली होती. त्यांना जो रूट ( 44) आणि बेन स्टोक्स (79) यांनी धावांचा पाऊस पाडताना इंग्लंडला 337 धावांपर्यंत मजल मारून दिली.
भारताच्या या पराभवानं पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्गात मोठा अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे बावचळलेल्या पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी टीम इंडियावर टीका केली. पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार यूनुसने भारतीय संघाच्या खिलाडूवृत्तीवर टीका केली. तो म्हणाला,''तुम्ही कोण आहात याला महत्त्व नसते... पण, आपण आयुष्यात काय करतो, त्यावरून आपली ओळख बनते. पाकिस्तान उपांत्य फेरीत प्रवेश करेल की नाही याची मला चिंता नाही. मात्र, भारतीय संघाच्या खिलाडूवृत्तीची परीक्षा होती आणि त्यात ते अपयशी ठरले.''
पाकिस्तानला रोखण्यासाठी टीम इंडिया मुद्दामून हरणार; माजी खेळाडूनं तोडले अकलेचे तारेपाकिस्तानला 1992चा करिष्मा पुन्हा करण्याची स्वप्न पडू लागली आहेत. पण, भारतीय संघ असं होऊ देणार नाही. पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश मिळू नये, यासाठी टीम इंडिया मुद्दामून अन्य संघांसोबत पराभव पत्करेल, असा दावा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बसीत अलीने केला होता. एका पाकिस्तानी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अलीनं हे अकलेचे तारे तोडले होते. अली म्हणाला,'' भारतीय संघाला पाकिस्तान उपांत्य फेरीत नकोय, त्यामुळे ते बांगलादेश व श्रीलंका यांच्याकडून मुद्दामून पराभूत होतील. भारताचे पाच सामने झालेले आहेत आणि पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. अफगाणिस्ताविरुद्ध ते कसे खेळले हे सर्वांनी पाहिले. पाकिस्तानने या गोष्टींकडे लक्ष न देता उर्वरित सामने जिंकण्याचा निर्धार करावा.''