लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाला रविवारी अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली परदेशात सलग दहा वन डे सामने जिंकण्याचा पराक्रम करणाऱ्या भारतीय संघाचा हा पराभव चाहत्यांच्या पचनी पडणारा नाहीच. उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर होण्याच्या मार्गावर असणाऱ्या इंग्लंड संघाने सर्वोत्तम खेळ केला, हे मान्य करणेही भारतीय चाहत्यांना जड जात आहे. त्यामुळेच पराभवाचे खापर सध्या महेंद्रसिंग धोनीवर फोडले जात आहे. धोनी संथ खेळला, रोहित शर्मा व कर्णधार कोहलीनं भारताला विजयी मार्गावर आणले होते, परंतु धोनीनं सामना गमावला. हातात पाच विकेट असूनही भारताला विजय मिळवण्यासाठी 31 धावा कमी पडल्या... धोनीनं निवृत्ती घ्यावी असे सल्लेही येऊ लागले आहेत... पण खरंच या पराभवाचं खापर धोनीवर फोडणे योग्य आहे का?
पाटा खेळपट्टीवर नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा होता आणि तो इंग्लंडच्या बाजूने लागला. इयॉन मॉर्गनने त्वरित फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. थोड्या निराश भावनेनं मलाही प्रथम फलंदाजी करायला आवडली असती, असं कोहली म्हणाला. तेव्हाच हा सामना हाय स्कोरींग होईल हे स्पष्ट होते. जगातील सर्वोत्तम गोलंदाज संघात असूनही भारताला 337 धावा खाव्या लागल्या. जसप्रीत बुमराह वगळला तर अन्य गोलंदाजांची धुलाईच झाली. युजवेंद्र चहलने तर वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात लाजीरवाणा विक्रम नावावर केला. त्याने एकही विकेट न घेता 10 षटकांत 88 धावा दिल्या.
आता डोळ्यासमोर 338 धावांचे लक्ष्य आहे, हे माहित असूनही भारतीय सलामीवीरांनी धडाक्यात सुरुवात केली नाही. सलामीवीर लोकेश राहुल ( 0) माघारी परतल्यानंतर तिसऱ्या षटकात कोहली मैदानावर आला. धावांचा पाठलाग करण्यात सर्वात यशस्वी फलंदाज म्हणून कोहली ओळखला जातो. त्यामुळे रोहित शर्मासह तो संघाला विजय मिळवून देईल असा आत्मविश्वास होता. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केली. या दोघांनी जवळपास 25 षटकं खेळून काढली. या जोडीनं जवळपास 5.30 च्या सरासरीनं धावा केल्या. त्यापाठोपाठ रोहितही शतक झळकावून माघारी परतला. कोहली बाद झाला तेव्हा भारताला विजयासाठी 9.55च्या सरासरीनं धावा करण्याची आवश्यकता होती.
कोहली-रोहित या जोडीनं 5.30च्या सरासरीनं धावा केल्या आणि धोनीकडून 10.50च्या सरासरीनं धावा करण्याची आपण अपेक्षा करतो. आयपीएलमध्ये चौकार - षटकारांची आतषबाजी करणारे रिषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी मिळून 62 चेंडूंत 77 धावा केल्या. म्हणजे त्यांनी 7 च्या सरासरीनं धावा केल्या. धोनी जेव्हा मैदानावर आला तेव्हा भारताची अवस्था 4 बाद 226 अशी होती आणि त्यांना 65 चेंडूंत 112 धावांची गरज होती. म्हणजे 10.34च्या सरासरीनं धावा करायचे होते. आता कोहली-रोहित, पंत-पांड्या यांच्या धावांच्या सरासरीशी तुलना केल्यास धोनीला अधिक वेगानं धावांचा पाठलाग करावा लागणार होता, हे दिसतच होते.
त्यात पांड्या बाद झाला तेव्हा भारताची अवस्था 5 बाद 267 अशी होती आणि अखेरच्या 31 चेंडूंत भारताला 71 धावा हव्या होत्या. म्हणजे 14च्या सरासरीनं धावा कराव्या लागणार होत्या. धोनीनं प्रयत्न केलेच नाही, हे म्हणणे चुकीचे आहे. रोहित-कोहली या जोडीनंही फटके मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनाही सीमारेषे पलिकडे चेंडू धाडता आला नाही. भारताकडून एकमेव षटकार धोनीनं मारला. त्यानं 31चेंडूंत 42 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट हा रोहित व कोहली यांच्यापेक्षा अधिक होता. धावांचा पाठलाग करताना धोनी 49 वेळा नाबाद राहिला आणि त्यात 47वेळा भारताने विजय मिळवले आहेत. एक सामना पराभूत झाला, तर एक अनिर्णीत राहिला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी ज्या चतुराईनं गोलंदाजी केली, त्यांच्या जाळ्यात कोहलीही अडकलाच ना? मग पराभवाचं खापर एकट्या धोनीवर का?