लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : अफगाणिस्तानवर विजय मिळवत पाकिस्तानने वर्ल्ड कप स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले आहेत. त्याचबरोबर त्यांनी इंग्लंडला मागे सारत गुणतालिकेत चौथे स्थानही पटकावले आहे. पण, आजच्या भारत-इंग्लंड सामन्यावर पाकिस्तानचे पुढील भवितव्य अवलंबून आहे. आज इंग्लंड हरल्यास पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग सुकर बनणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच पाकिस्तानचे चाहते भारताच्या विजयासाठी दुवा मागतील.
अखेरच्या षटकात अफगाणिस्तानवर विजय मिळवत पाकिस्तानने आपले आव्हान कायम ठेवले आहे. या विजयासह पाकिस्तानने 9 गुणांची कमाई करत चौथे स्थान पटकावले आहे. इंग्लंडचे आतापर्यंत आठ गुण आहेत, त्यामुळे त्यांची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यावर साऱ्यांनाच नजरा असतील. या सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघ उपांत्य फेरीतील स्थान पक्के करेल. शिवाय इंग्लंडचे आव्हान अधिक खडतर बनणार आहे. त्यांना अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवावा लागेल, पण त्याचवेळी पाकिस्तान पराभूत होण्यासाठी प्रार्थना करावी लागेल. पाकिस्तानचा अखेरचा सामना बांगलादेशविरुद्ध आहे.
भारतावर अवलंबून असलेल्या पाकिस्तानला डिवचण्यासाठी आणखी एक व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. त्यात भारतीय आणि पाकिस्तानी चाहत्यांमध्ये संवाद दाखवण्यात आला आहे. पाहा व्हिडीओ...
- या दोन्ही संघांदरम्यान सन १९७४ पासून आतापर्यंत ९९ आंतरराष्टÑीय एकदिवसीय सामने झाले असून, त्यापैकी भारताने ५३ सामने जिंकून वर्चस्व राखले आहे. इंग्लंडने ४१ सामने जिंकले आहेत. याशिवाय दोन सामने टाय झाले असून, तीन सामने कोणत्याही निकालाविना संपले.
- या दोन्ही संघांदरम्यान शेवटच्या पाच लढतींमधील तीन सामने इंग्लंडने, तर दोन सामने भारताने जिंकले आहेत.
- या दोन्ही संघांदरम्यान विश्वचषकामध्ये १९७५ पासून आतापर्यंत सात सामने झाले असून, यातील प्रत्येकी तीन सामन्यांमध्ये भारत आणि इंग्लंडने विजय मिळविलेला आहे. एक सामना टाय झाला आहे.
- विश्वचषकामध्ये या दोन्ही संघांनी परस्परांच्या विरोधात ३३८ धावा अशी सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे.
- भारताची इंग्लंडच्या विरोधात १३२ धावांची नीचांकी खेळी आहे, तर इंग्लंडची नीचांकी धावसंख्या १६८ आहे.