साऊथम्पटन : ‘यशाचा आणि अपयशाचा आपल्यावर फारसा परिणाम होत नाही. स्पष्ट विचारांमुळे मी तटस्थ जगण्याची कला शिकलो,’ असे मत भारतीय अष्टपैलू स्टार हार्दिक पांड्या याने शुक्रवारी व्यक्त केले. कारकीर्दीत जखमांमुळे त्रस्त असलेल्या हार्दिकसाठी पुनरागमन सोपे नव्हते. तरीही शानदार पुनरागमन करीत गुजरात टायटन्सला आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले.
आयर्लंडविरुद्ध नेतृत्व करीत मालिका जिंकून दिली. काल इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-२०, तर ३३ चेंडूंत ५१ धावा ठोकल्या, शिवाय ३३ धावांत चार बळी घेतले. एकहाती सामना जिंकून दिल्यानंतर हार्दिक म्हणाला, ‘कठोर मेहनत नेहमी यशस्वी ठरते. तुमचे विचार स्पष्ट असतील तर मेहनत वाया जात नाही. मी स्वत:ला नेहमी सज्ज ठेवू इच्छितो. अनेकदा यश तुमच्या बाजूने येईल किंवा विरोधातही जाईल. आपण मात्र मितभाषीपणाने मेहनत कायम ठेवायला हवी. माझे मत स्पष्ट आहे.
आपण रुळावरून घसरलो तरी चाहत्यांच्या सहकार्यामुळे पुन्हा रुळावर येऊ शकतो. अनेकदा विचार करण्याची वेळ संपते तेव्हा घाईघाईने निर्णय न घेता काही वेळ शांत राहतो. क्रिकेट वगळता आयुष्यातही माझे आचरण असेच आहे. विचलित झालो तरी माझे कुटुंबीय कृणाल, वहिनी आणि माझी पत्नी मला सावरतात. कुटुंबात ताळमेळ असल्याने मी गोंधळलो तरी ते योग्य तोडगा सुचवतात,’ असेही हार्दिकने सांगितले.
कसोटीबाबत विचार करत नाही
‘कसोटी क्रिकेट हे सर्वच खेळाडूंना आव्हान देत असते. मी मात्र कसोटी क्रिकेटबाबत अधिक विचार करीत नाही. सध्यातरी मर्यादित षटकांच्या खेळावर फोकस करीत आहे. कसोटी खेळण्याची संधी मिळेल त्यावेळी लाल चेंडूने कसे खेळायचे याचा विचार करू. जे पुढे आहे त्यात शंभर टक्के योगदान द्या,’ हाच माझ्या यशाचा मंत्र असल्याचे हार्दिकने सांगितले.
Web Title: India vs England My mindset doesnt take me too high neither low says Hardik Pandya dont thik about success
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.