विश्वचषकाकडे लक्ष ठेवून भारताने या मालिकेत नव्या चेहऱ्यांचा प्रयोग केला. फलंदाजीत हा प्रयोग अधिक होता. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी क्रमात बदल करीत पाठोपाठ विजय मिळविणे हा गोड शेवट ठरला. सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांचा आक्रमक धडाका आयपीएलचा परिणाम म्हणावा लागेल. नेट्समध्ये जे शिकता येत नाही ते कौशल्य, आत्मविश्वास आणि हार न माणण्याची वृत्ती हे सर्व गुण नव्या दमाच्या खेळाडूंना आयपीएलमधून शिकता आले.
भारताने निर्णायक सामन्यात योग्य ताळमेळ साधला. रोहित आणि विराट यांनी या प्रकारात प्रथमच सलामी दिली. माझ्या मते पुढे जाण्याचा हाच योग्य मार्ग आहे. सध्या जागतिक क्रिकेटमध्ये दोघेही सर्वोत्कृष्ट फलंदाज आहेत. दोघांनी पाया रचून मधल्या फळीला अधिक षटके मिळावीत याची सोय करून ठेवली होती. भारतीय संघ सोयीनुसार खेळाडू निवडू शकतो. पण त्यालादेखील मर्यादा असतात. सतत बदलाच्या प्रलोभनापासून सावध असायला हवे. टी-२० मध्ये ही मोठी जोखीम ठरू शकते. त्यामुळे खेळाडूंना भक्कम पाठिंबा देत राहणेदेखील आवश्यक आहे.
भारताच्या जमेची बाजू ही की १५ महिन्यांनंतर भुवनेश्वरने केलेले यशस्वी पुनरागमन. भुवीने महत्त्वाच्या क्षणी धावा रोखून गडीदेखील बाद केले. अनुभवी मारा करणारा हा वेगवान गोलंदाज सहकाऱ्यांसाठी मार्गदाता बनला. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचे पुनरागमन होईपर्यंत तरी किमान या संघाने भेदक मारा करीत राहणे काळाची गरज आहे.
आता ५० षटकांचे सामने सुरू होणार आहेत. या दौऱ्यात काहीतरी मिळविण्याचा इंग्लंडचा निर्धार असावा. या प्रकारात ते विश्वविजेते आहेत. तेव्हा स्थानिक खेळपट्ट्यांवर भारताला त्तीन सामन्यात भक्कम तयारीनिशी उतरावे लागेल. मागच्या तिन्ही मालिकांवर नजर टाकल्यास पहिला सामना गमावल्यानंतर भारताने मुसंडी मारल्याचे पाहायला मिळाले. नव्या आव्हानाला सामोरे जाताना परंपरा मोडीत काढावी लागेल. मंगळवारी पुण्यात विजयी सुरुवात करावीच लागेल.