लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याला भारताचा फिरकीपटू आर. अश्विन मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण गुरुवारी झालेल्या सरावामध्ये अश्विन सहभागी झाला नव्हता. त्यामुळे तो पाचव्या कसोटीत खेळणार नसल्याचे म्हटले जात आहे.
अश्विनला तिसऱ्या कसोटी सामन्यात दुखापत झाली होती. अश्विनच्या मांडीतील स्नायू दुखावले होते. चौथ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला अश्विनची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीनुसार अश्विनला पाच दिवसांची विश्रांती द्यावी लागणार होती. पण संघ व्यवस्थापन आणि कर्णधार विराट कोहली यांनी त्याला जायबंदी असतानाही खेळवले होते.
चौथ्या कसोटी सामन्यात जायबंदी असून अश्विन खेळला. या गोष्टीचा परिणाम त्याच्या आणि संघाच्या कामगिरीवरही झाला. या सामन्यात अश्विनला फक्त तीन बळी मिळवता आले होते. त्याचबरोबर फलंदाजीमध्येही त्याला जास्त धावा करता आल्या नव्हत्या.
जायबंदी असूनही खेळवल्यामुळे अश्विनची प्रकृती बिघडली असल्याचे म्हटले जात आहे. यापुढे जर अश्विनला खेळायचे असेल तर त्याने सक्तीची विश्रांती घेणे गरजेचे असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे पाचव्या कसोटी सामन्यात अश्विन संघात दिसणार नसल्याचे म्हटले जात आहे.