भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची RT-PCR टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी शास्त्री यांची टेस्ट करण्यात आली आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना लंडनमधील नियमांनुसार १० दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. शास्त्री यांच्यासोबत गोलंदाज प्रशिक्षक भरत अरूण, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांनाही विलगिकरणात राहण्याचा सल्ला BCCIच्या वैद्यकिय टीमनं दिला होता. त्यांच्यापैकी भरत अरुण व आर श्रीधर यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ( Ravi Shastri, Bharat Arun and R Sridhar test positive for COVID-19)
भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला आहे, तेथे पार पडलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शास्त्रींनी हजेरी लावली होती आणि तेथे बाहेरील पाहुण्यांनाही प्रवेश दिला गेला होता. Sportsmail नं दिलेल्या वृत्तानुसार शास्त्री यांच्यासोबत टीम इंडियाचे काही सदस्यही या सोहळ्याला उपस्थित होते. याबाबत त्यांनी इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाला ( ECB) कोणतीच कल्पना दिली नाही. याचवेळी शास्त्री कोरोना रुग्णाच्या संपर्कात आले असावेत असा अंदाज बांधला जात आहे.