India vs England, 3rd ODI, Pune: भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) सध्या जोरदार फॉर्मात आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतही पंतनं आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. पंतनं आपल्या जबरदस्त खेळीनं भारतीय संघाच्या तिन्ही फॉर्मेटमधील क्रिकेट संघात आपलं स्थान निश्चित केलं आहे. फलंदाजीतील सातत्यानं रिषभनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इंजमाम उल हक देखील रिषभ पंतचे फॅन झाले आहेत. (Inzamam ul haq Praises Rishabh Pant)
इंजमाम उल हक यांनी नुकतंच त्यांच्या यूट्यूब चॅनलवर भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याबाबत भाष्य केलं. भारतीय संघानं इंग्लंडसमोर ठेवलेल्या मोठ्या आव्हानामध्ये रिषभ पंतचं मोलाचं योगदान होतं, येत्या काळात रिषभ जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाज म्हणून स्वत:ला सिद्ध करुन दाखवेल, असं इंजमाम म्हणाले.
"रिषभ पंतनं भारतीय संघाच्या मधल्या फळीत आत्मविश्वास निर्माण केला आहे. ४० चेंडूत ७७ धावांची खेळी पंतनं केली. त्याच्यामुळे भारतीय संघाच्या धावसंख्येची सरासरी चांगली राहिली. मी गेल्या ६-७ महिन्यांपासून पंतच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहे. ज्यापद्धतीनं तो मोकळेपणानं खेळतो आणि ज्या पद्धतीचे कमाल फटके त्याच्याकडे आहेत हे मी गेल्या ३०-३५ वर्षात फक्त महेंद्रसिंग धोनी आणि अॅडम गिलख्रिस्ट यांच्याकडे पाहिलं आहे. सामना खेचून आणण्याची ताकद ठेवणारे हे क्रिकेटपटू होते. सध्या ज्या पद्धतीनं रिषभ खेळतोय तोही आगामी काळात धोनी, गिलख्रिस्ट यांनाही मागे टाकेल", असं इंजमाम उल हक म्हणाले.
पंत जोरदार फॉर्मातरिषभ पंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासूनच जोरदार फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलियात ब्रिस्बेन कसोटीत पंतनं नाबाद ८९ धावांची खेळी साकारून भारतीय संघाचा ऐतिहासिक मालिका विजय प्राप्त करुन दिला होता. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ५४ च्या सरासरीनं रिषभनं २७० धावा केल्या. तर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्यानं केवळ ४० चेंडूत ७७ धावांची तुफान खेळी साकारली.