मुंबई : इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारताच्या क्रिकेट संघाला अजूनही जम बसवता आलेला नाही. ट्वेन्टी-20 आणि एकदिवसीय मालिका झाली, पण तरीही संघात योग्य समन्वय दिसत नाही. त्यामुळे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी काळजीपूर्वक वक्तव्य करावी, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू आणि निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांनी आपल्या स्तंभात मांडले आहेत.
पाटील पुढे म्हणतात की, " इंग्लंडचा दौरा हा भारतीयांसाठी नेहमीच आव्हानात्मक राहीलेला आहे. कारण इंग्लंडमध्ये एका दिवसात तीन ऋतू दिसू शकतात. वातावरण सतत बदलत असले आणि या वातावरणाचा सामना करणे कोणत्याही परेदशी खेळाडूसाठी सोपे नसते. त्यामुळे आतापर्यंत भारतासाठी शंभर कसोटी सामने खेळलेल्या खेळाडूसाठीही इंग्लंडचा दौरा आव्हानात्मक असतो. "
भारतीय संघात काय समीकरण असावंकोहलीला संघात प्रत्येकी पाच गोलंदाज आणि फलंदाज हवे असतात. पण इंग्लंडमध्ये जर सामने जिंकायचे असतील, तर त्याला हे समीकरण बदलायला हवं. भारताने इंग्लंडमध्ये 6 फलंदाज आणि चार गोलंदाज या समीकरणानिशी खेळायला हवे. भारतीय संघाने सुनील गावस्कर, सौरव गांगुली यासारख्या माजी खेळाडूंकडून शिकायला हवे, असेही पाटील यांनी आपल्या स्तंभात म्हटले आहे.