नवी दिल्ली - भारताच्या कसोटी संघात सलामीचा गुंता अजूनही कायम आहे. सलामीच्या शर्यतीत लोकेश राहुल, मुरली विजय आणि शिखर धवन यांच्यात चढाओढ सुरू आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने हा गुंता सोडवला आहे. गांगुलीने इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी मुरली विजय आणि लोकेश राहुल यांना पसंती दर्शवली आहे. शिखर धवन हा वन डेसाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे गांगुलीने सांगितले. कसोटीतील त्याची कामगिरी गांगुलीला प्रभावित करू शकलेली नाही.
(सराव सामना : कार्तिक -विराटने सावरला भारताचा डाव)तो म्हणाला, ''इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी सलामीला माझी पहिली पसंती विजय आणि राहुल असेल. धवन वन डेसाठी चांगला पर्याय आहे आणि वन डे मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली आहे. मात्र, परदेशातील खेळपट्टींवरील कसोटी सामन्यातील त्याची कामगिरी तितकी प्रभावित झालेली नाही. भारतात त्याची कामगिरी चांगली झालेली आहे आणि त्याला त्याचे श्रेय द्यायलाच हवे. संघ व्यवस्थापन काय निर्णय घेतो, याची उत्सुकता आहे.''
भारतात झालेल्या अफगाणिस्तानविरूद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी लंच ब्रेकपूर्वीच धवनने शतक झळकावले होते आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. मात्र, एसेक्सविरूद्ध सुरू असलेल्या सराव सामन्यात त्याला भोपळाही फोडता आलेला नाही. दुसरीकडे विजय आणि राहुल यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावले आहे.