Join us  

दुसरी टी-२० लढत आज : कोहलीवर कामगिरीचे 'विराट' दडपण

इंग्लंडविरुद्ध विराट सलामीला खेळणार.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2022 10:18 AM

Open in App

बर्मिंगहॅम : पाच महिन्यांनतर टी-२० क्रिकेटमध्ये पुनरागमन करत असलेला स्टार विराट कोहली आज शनिवारी इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टी-२० लढतीत कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला उतरण्याची दाट शक्यता आहे. टीम इंडियाचे युवा खेळाडू दमदार कामगिरी करत असताना कोहलीवर मोठ्या कामगिरीचे दडपण असेल, हे स्पष्टच आहे. 

कोहली अखेरचा टी-२० सामना फेब्रुवारीत खेळला. गतवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये  टी-२० विश्वचषकात भारताची खराब कामगिरी झाली. तेव्हापासून विराट केवळ दोन टी-२० सामने खेळला. त्यातही तो ‘फ्लॉप’ झाला. आयपीएलमध्येही त्याची लौकिकाला साजेशी कामगिरी नव्हती. रोटेशन धोरणानुसार कोहली आणि अन्य वरिष्ठ खेळाडूंंनी वेळोवेळी विश्रांती घेतली. कोहलीच्या जागी दीपक हुड्डा तिसऱ्या स्थानी खेळला. त्याची कामगिरी पाहता त्याला बाहेर बसविणे कठीण वाटते. इंग्लंडविरुद्ध पहिल्या लढतीतही दीपकने १७ चेंडूत ३३ धावा केल्या. हुड्डा आपल्या स्थानावर खेळणार असेल तर विराटला रोहितसोबत सलामीला खेळावे लागेल. अशावेळी इशान किशनवर बाहेर बसण्याची वेळ येईल. 

कोहलीने अखेरचे अर्धशतक  डावाची सुरुवात  करत ठोकले होते. विंडीजविरुद्ध आगामी पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतून कोहलीला ब्रेक देण्यात आल्याने इंग्लंडविरुद्धचे दोन सामने कोहलीचे या प्रकारातील भविष्य निश्चित करू शकतील. कोहलीने अनेकदा स्वत:ची योग्यता सिद्ध केली हे खरे आहे, मात्र सध्या युवा खेळाडू ज्या बेधडकपणे खेळतात त्या पार्श्वभूमीवर देखील धडाका करण्याचे कोहलीपुढे आव्हान असेल. 

भुवनेश्वरने नव्या चेंडूवर लक्षवेधी कामगिरी केली. आता बुमराह सोबतीला असेल. अर्शदीपचे पदार्पणही यशस्वी ठरले. तो बाहेर बसणार असेल तर उमरान मलिकला संधी मिळू शकते.  हार्दिकने फलंदाजी-गोलंदाजीत चोख कामगिरी केली. क्षेत्ररक्षणाची बाजू मात्र सुधारण्याची गरज आहे. इंग्लिश संघ पराभव विसरुन चवताळून खेळण्याच्या विचारात असावा. पहिल्या चेंडूवर बाद झालेला जोस बटलर कसा खेळतो, यावरही समीकरणे विसंबून असतील. 

फलंदाजी भक्कम होणार?कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि श्रेयस अय्यर हे संघात परतल्यामुळे ‘फिनिशिंग’वर काम करावे लागेल. पहिल्या सामन्यात संघाला एका फलंदाजाची उणीव जाणवली. आता अक्षर पटेलची जागा रवींद्र जडेजा घेत असल्यामुळे फलंदाजी भक्कम होईल, असे दिसते. 

टॅग्स :विराट कोहलीटी-20 क्रिकेटइंग्लंड
Open in App