लंडन - भारताचा सलामीवीर शिखर धवन याची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. एसेक्स क्लबविरूद्धच्या सराव सामन्यात धवनला भोपळाही न फोडता माघारी परतावे लागले होते. पहिल्याच चेंडूवर मॅट कोल्सच्या गोलंदाजीवर धवन यष्टीरक्षक जेम्स फोस्टरकरवी झेलबाद झाला होता. इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत लोकेश राहुलएवजी धवनला सलामीची संधी देण्याची शक्यता अधिक आहे, परंतु सराव सामन्यातील अपयशामुळे त्याचे स्थान धोक्यात आले आहे. या अपयशाने सोशल मीडियावर नेटीजन्स त्याची चांगलीच खिल्ली उडवत आहेत.
(India vs England: सौरव गांगुली म्हणाला शिखर धवन कसोटीत सलामीसाठी पात्र नाही!)एसेक्सविरूद्घच्या लढतीत धवन शुन्यावर बाद झाला, तर सलामीच्या शर्यतीत असलेले राहुल आणि मुरली विजय यांनी वैयक्तिक खेळी साकारून आपले नाणे खणखणीत केले आहे. या वर्षाच्या सुरूवातीला दक्षिण आफ्रिका दौ-यातूनही खराब कामगिरीमुळे धवनला बसवण्यात आले होते. एसेक्सविरूद्धच्या सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी तो शुन्यावर बाद झाला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर धवनने नेट प्रॅक्टीसचा व्हिडीओ ट्विट केला आणि त्यावर नेटीजन्सने त्याची खिल्ली उडवली.
(सराव सामना : कार्तिक -विराटने सावरला भारताचा डाव)पहिल्या सराव सामन्यात एसेक्सविरुद्ध भारताने पहिल्या दिवशी सहा बाद ३२२ धावा केल्या. दिनेश कार्तिक ८१ तर हार्दिक पंड्या २२ धावांवर खेळत आहेत. मुरली विजय व कर्णधार कोहलीने डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. विजयने ११३ चेंडूत ५३ धावा केल्या.विजय बाद झाल्यानंतर विराट कोहलीही ६८ धावांवर तंबूत परतला. विराटने ९४ चेंडूचा सामना केला. यात त्याने १४ चौकार लगावले. भारतीय संघ अडचणीत आला असताना दिनेश कार्तिक व लोकेश राहूल यांनी भारताची धावसंख्या २५० च्या पुढे नेली. राहूलने ९२ चेंडूत ५८ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या हार्दिक पंड्याने व कार्तिकने कोणतही पडझड होऊ दिली नाही.