नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला काही दिवसांत सुरुवात होणार आहे. या मालिकेत इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवण्यासाठी आर. अश्विनने खास रणनीती आखली आहे.
भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडमधील एकदिवसीय मालिका गमवावी लागली. आता कसोटी मालिका तरी भारतीय संघ जिंकणार का, याची उत्सुकता साऱ्यांना आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला 1 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. अश्विनला ट्वेन्टी-20 आणि एकदिवसीय संघातून वगळण्यात आले आहे. पण अश्विनचे कसोटी संघातील स्थान मात्र कायम आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी केलेल्या तयारीबद्दल अश्विन म्हणाला की, " इंग्लंडचा दौरा हा माझ्यासाठी खास आहे. इंग्लंडमध्ये फिरकीला पोषक खेळपट्टी नसते, असे म्हटले जाते. पण हेच फिरकीपटूसाठी मोठे आव्हान असते. हे आव्हान अनुभवाच्या जोरावर मी नक्कीच पूर्ण करेन. इंग्लंडच्या फलंदाजांसाठी मी विशेष रणनीती आखली आहे. या रणनीतीची योग्य अमंलबजावणी झाली तर भारतीय संघ विजयासमीप पोहोचू शकतो. "